लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा व शहरात स्टॅम्प पेपरचा खरोखरच तुटवडा निर्माण झालाय की कृत्रिम तुटवडा करून नागरिकांना वेठीस धरले जातेय, याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला. आर. यांनी गुरुवारी दिले.
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडेही नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येताहेत. ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अखेर याची गंभीर दखल घेत यासंदर्भात नियोजनाचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना पत्र लिहून शहर व ग्रामीण भागात स्टॅम्प पेपरचा तुटवडा होणार नाही. यासाठी योग्य नियोजन करण्यास सांगितले आहे. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना नियमित मुद्रांक मिळत आहेत किंवा नाही याची खातरजमा करावी, तसेच खरोखरच तुटवडा आहे की कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांना विनाकारण त्रास दिला जातोय याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.