नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वाघिणीपासून भरकटलेले दाेन बछडे पर्यटक, तसेच गस्ती कर्मचाऱ्यांना दिसले हाेते. हे बछडे टी-६६ वाघिणीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दाेन-तीन दिवस पाहणी केल्यानंतरही वाघीण तिकडे न आल्याने, या बछड्यांना बुधवारी गाेरेवाडा येथे आणण्यात आले.
टी-६६ वाघिणीचे हे बछडे पर्यटकांना व क्षेत्रीय गस्ती कर्मचाऱ्यांना २३ मे राेजी दिसले हाेते. त्यांच्या हालचालींवर वन कर्मचारी मागोवा ठेवून होते. दाेन-तीन दिवस वाघीण तिकडे न आल्याने, एनटीसीए एसओपीनुसार समिती गठीत करण्यात आली. त्या परित्यक्त बछड्यातील एक बछडा अतिशय अशक्त वाटल्याने, त्याचे जवळून निरीक्षण करण्याची गरज भासली. त्यानुसार, मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्या परवानगीने बछडे पकडण्यात आले. यावेळी पशुवैद्यक डॉ.मयूर पावशे आणि डॉ.सुजित कोलंगत यांनी निरीक्षण केले व बछड्यांना तत्काळ औषधोपचार करून पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार, क्षेत्र संचालक ए.श्रीलक्ष्मी यांनी मुख्य वन्यजीव संरक्षक यांना माहिती दिली. बछड्यांना पुढील औषधोचारासाठी गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथे हलविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आज रात्री दोन्ही बछडे गोरेवाडा, नागपूर येथे हलविण्यात आले आहेत.
ही कार्यवाही उपसंचालक प्रमोद पंचभाई, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, डॉ.शिरीष उपाध्ये यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक, अतुल देवकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे व इतर क्षेत्रीय कर्मचारी यांनी पार पाडली.