नागपूर : नागपूर वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे खवल्या मांजरांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टाेळीतील दाेन आराेपींना जेरबंद केले आहे. पवनी वनपरिक्षेत्रातील हिवरा गावाजवळ फुलझरीच्या रस्त्यावर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. आराेपींजवळून २५ नग खवले, एक माेटरसायकल व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
प्रशांत गणेश चाचेरे (२७) व दिलीप मयाराम आदमने (३८) दाेघेही रा. खनाेरा असे आराेपींची नावे आहेत. या दाेघांनी सखाेल चाैकशी केली असता तिसरा आराेपीही असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पथकाने बुधवारी रमजान घाेटी येथील रहिवासी मिलतराम चमरू भलावी या आराेपीच्या घरी धाड टाकली असता वन्यजीवांच्या अवयवांचे माेठे घबाड सापडले. आराेपीच्या घरी मांजराचे १५ किलाे खवले, कुजलेल्या अवस्थेतील माेराची अंडी, माेराचे ९० पंख, २३ नग तार व फासे, दाेन बंडल वायर राेप फासे, ६ जाळे, २ भाेसाआरी, ४ लाेखंडी कुऱ्हाडी, सागवानाची खाेडे असा माेठा साठा आढळून आला. आराेपी मिलतराम भलावी मात्र फरार झाला. वनविभागाने या आराेपींना न्यायालयासमाेर हजर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दाेन्ही आराेपींना २७ ऑगस्टपर्यंत वनकाेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी.जी. कोडापे, सहायक वनसंरक्षक एस.बी. गिरी, पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन. भाेंगाडे, रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. शेंडे, एस.बी. माेहाेड यांच्यासह पवनी व रामटेक वनपरिक्षेत्रातील वनपाल सुधेकर, गिरीपुंजे, बाबीनवाले, वनरक्षक साेडगीर, मस्के, खंडाते, ईटवले, केरवार, भेलेकर, नागपूरचे वनपाल शुक्ला यांचा कारवाईत सहभाग हाेता. एस.बी. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.