लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेकांना मोकळीक मिळाली आहे. त्यासोबतच गुटखा, सुगंधित तंबाखू यासारख्या प्रतिबंधित साहित्याची तस्करीही सुरू झाली असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणा एक्स्प्रेसमधून सुगंधित तंबाखू जप्त करून पार्सल एजंटला अटक केली आहे.विजय उपदेशे (४२) रा. आंबेडकर कॉलनी, लष्करीबाग असे आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाच्यावतीने विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांना पार्सल व्हॅन जोडून पार्सलची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे पार्सल व्हॅनचा फायदा घेण्यासाठी तस्कर सरसावले आहेत. पार्सलच्या नावाखाली पॅकिंग करून प्रतिबंधित साहित्य पाठविणे सुरू झाले आहे. तेलंगणा स्पेशल एक्स्प्रेसमधून सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची माहिती पार्सल लिपिकाकडुन आरपीएफला मिळाली. शुक्रवारी ही गाडी नागपूर स्थानकावर दाखल होताच आरपीएफच्या जवानांनी गाडीची तपासणी सुरू केली. त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे सहा पाकिट आढळले. आरपीएफच्या जवानांनी २४ हजार २४० रुपये किमतीचा तंबाखू जप्त केला. हा माल दिल्लीहून पाठविण्यात आला होता. तो नागपूरला उतरविण्यात येणार असल्यामुळे शुक्रवारी कारवाई नंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सुगंधित तंबाखू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आरपीएफच्या जवानांनी अटक करून त्याच्या विरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पार्सलच्या नावाखाली पाठविला सुगंधित तंबाखू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:36 AM