बॅरिस्टर शेषराव वानखेडे जन्मशताब्दी सोहळा : विद्यापीठात पुढील वर्षापासून बॅ. वानखेडे सुवर्णपदक नागपूर : बॅरिस्टर शेषराव वानखेडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त एका सोहळ्याचे आयोजन बुधवारी २३ सप्टेंबर रोजी कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान केल्याबद्दल आणि दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘स्पोर्टस्ची कीट’ देण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या कुंदाताई विजयकर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बॅरिस्टर वानखेडे प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या रमोला महाजनी, अटलबहादूर सिंग, यशवंत लांडे, अविनाश विजयकर, अनिता विजयकर, अनुजा केदार, विठ्ठलराव टालाटुले, सुधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते. कुंदाताई म्हणाल्या, बॅरिस्टर वानखेडे माझे वडील होते. त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला आजपासून प्रारंभ करीत असून गुरुवारी यानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी प्रतिकूलतेत यश मिळवीत आहेत. सुविधा नसताना या विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेले हे यशअसामान्य आहे. त्यामुळेच आमच्या संस्थेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा साहित्य आणि गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचा हा सोहळा आयोजित केला. होतकरू विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती यावेळी प्रदान करण्यात आली. याशिवाय बॅरिस्टर वानखेडे यांचा संस्कृत आणि इंग्रजीचा पाया सोमलवार हायस्कूलमध्ये पक्का झाला. त्यामुळेच सोमलवार शाळेतील इंग्रजी आणि संस्कृत ग्रंथालयाला दरवर्षी बॅरिस्टर वानखेडे यांच्या नावाने १० हजार रुपयांचा निधी देण्यात येतो, असे कुंदातार्इंनी सांगितले. याप्रसंगी बॅरिस्टर शेषराव वानखेडे कला, वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडाच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेळाडू अनिरुद्ध चौरे, जितेंद्र पटेल, विलास ढोके, विकास कामडे, ओमप्रकाश चौधरी, मेघा कुळमते, अक्षय जंजाळ, सूरज सातपुते यांना क्रीडा साहित्य प्रदान करण्यात आले. तर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनी इंकिता नेवारे, रश्मी ढोले आणि नयना वानखेडे यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती
By admin | Published: September 24, 2015 3:27 AM