लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्याने रक्कम अडकली. ती लवकरच उपलब्ध केली जाईल. तसेच शिष्यवृत्तीची रक्कम दर तीन वर्षांनी वाढविणे आवश्यक आहे, त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केली जाईल, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
मागील तब्बल ११ वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे महागाईच्या या काळात शिष्यवृत्तीच्या भरवशावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासोबतच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मागील काही वर्षांपासून बऱ्याच अडचणी येत आहेत. गेल्या दोन वर्षात तर या अडचणी जास्तच वाढलेल्या आहेत. यातच केंद्र सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद करण्याच्या विचारात असल्याची चर्चाही सुरू होती. या दोन्ही प्रश्नासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून सरकारचे लक्ष वेधले होते. रविवारी आठवले यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, शिष्यवृत्तीच्या भरवशावरच मी शिकू शकलो. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला आहे. शिष्यवृत्ती बंद करण्याबाबत सरकारचा कुठलाही विचार नाही. ती बंद होणार नाही. तसेच दर तीन वर्षांनी शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यात यावी, याबाबतही लवकरच कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कास्ट्राईबच्या शिष्टमंडळानेही घेतली भेट
दरम्यान, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सुद्धा रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्याचे निवेदन सादर केले. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आठवले यांनी सर्व विषय समजून घेऊन त्यावर कार्यवाहीचे आश्वासन दिले.