समाजमन स्तब्ध : पाच दिवसांपूर्वीच दिले होते आत्महत्येचे संकेतलोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : स्कूल बॅग हे तसे कुणाच्या मृत्यूचे कारण होऊ शकेल का? पण, दुर्दैवाने असे घडलेय खरे. सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या विद्यार्थ्याने स्कूल बॅगसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरला. परंतु सध्या शेतीची कामे ऐन भरात असल्याने व्यस्ततेमुळे त्याच्या वडिलांना ते वेळीच शक्य झाले नाही. यामुळे संतापलेल्या या बालकाने थेट घराच्या धाब्यावर जाऊन गळफास घेतला. सावनेर-नागपूर मार्गावरील माळेगाव (टाकळी) येथील या घटनेने समाजमन स्तब्ध झाले असून, या वयातील मुलांच्या शीघ्रकोपीपणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शिवम राजेश कोहळे (१३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. राजेश कोहळे हे शेतकरी असून, त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे. शिवम हा त्यांचा एकुलला एक मुलगा. तो माळेगाव (टाकळी) येथील प्रकाश विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकायचा. शिवमला तीन बहिणी असून, तिघ्याही त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत. शाळा सुरू झाल्याने शिवमने नवीन स्कूल बॅगसाठी वडिलांकडे हट्ट धरला होता. पेरणीचा काळ सुरू असल्यामुळे वडिलांना शिवमसाठी नवीन स्कूल बॅग वेळीच खरेदी करणे शक्य झाले नाही. ‘मला जर स्कूल बॅग घेऊन दिली नाही तर मी गळफास लावेन’ असे शिवम चार-पाच दिवसांपूर्वीच बोलला होता. पण, तो खर्रंच असे टोकाचे पाऊल उचलेल असे कुणालाच वाटले नाही. शिवमचे आई व वडील रविवारी सकाळी शेतात गेले होते. तो तिन्ही बहिणींसोबत घरी असताना अगदी बेमालूमपणे धाब्यावर चढला अन् छताला गळफास लावून मृत्यूला कवटाळले. बराच वेळ होऊनही शिवम दिसत नसल्याने मोठी बहीण त्याला शोधण्यासाठी धाब्यावर गेली. तेव्हा तिला शिवम लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच आई-वडिलांनी घर गाठले. शिवमला पाहताच आईने हंबरडा फोडला. पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी पंचनामा करून शिवमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेरला पाठविला. या घटनेमुळे अवघ्या माळेगाव(टाकळी)वर शोककळा पसरली आहे. या घटनेने या वयातील बालकांच्या अतिसंवेदनशीलपणाला पुन्हा अधोरेखित केले असून पालकही अस्वस्थ झाले आहेत.
स्कूल बॅगच्या हट्टापायी विद्यार्थ्याचा आत्मघात
By admin | Published: July 10, 2017 1:19 AM