लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : राज्य शासनाच्या निर्देशानुसार कुही तालुक्यातील वग येथील बालाजी पाटील हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि.२०) इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत व पालकांनी संमती दर्शविल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर मंगळवारी शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत हाेता. या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी काेराेना प्रतिबंधक सर्व उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्यात आले.
वग येथील या शाळेत वग, वीरखंडी व पारडी गावातील मुले शिक्षण घेतात. गेल्या दीड वर्षापासून काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद हाेत्या. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार बालाजी पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक सज्जन पाटील यांनी सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक तसेच संबंधित पालकांशी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली. शासनाच्या नियमावलीनुसार सर्व प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतर पालकांनी संमतीपत्र तसेच ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मंगळवारी वग येथे शाळा सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी १०९ पैकी ५९ विद्यार्थी हजर झाले. यावेळी मुख्याध्यापक सज्जन पाटील व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी शाळेतील प्रत्येक वर्गखाेलीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. थर्मल स्किनिंग व हॅण्ड सॅनिटायझेशन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक चंद्रकांत दडमल, चव्हाण, निनावे, मधुकर पराते, बादल देशमुख उपस्थित हाेते.
तालुक्यातील इतर शाळा कधी सुरू हाेणार, याबाबत गटशिक्षणाधिकारी शारदा किनारकर यांना विचारले असता, तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार येत्या एक-दाेन दिवसात बऱ्याच शाळा सुरू हाेतील, असे त्यांनी सांगितले. नगर पंचायत असलेल्या कुही शहरात शाळा सुरू हाेण्यास विलंब लागेल. शहरी भागात शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे अद्याप मार्गदर्शक तत्त्व प्राप्त झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.