लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील विविध तलाव पाण्याने भरलेले असल्याने स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मुक्काम इतरत्र हलवला आहे. मात्र गोरेवाडा तलाव या प्रवासी पक्ष्यांच्या गर्दीने चांगलाच फुलला आहे. १० ते १५ प्रजातीचे पक्षी येथे दाखल झाले असून पक्षी प्रतीक्षेत असलेल्या पक्षी निरीक्षकांना मोठी संधी मिळाली आहे.
गोरेवाडाचे रेंजर पांडुरंग पखाले यांनी लोकमतशी बोलताना या पाहुण्यांच्या हालचालीकडे लक्ष वेधले. तिरतीरा या चिमणीच्या आकाराच्या हिमालयातून येणाऱ्या पक्ष्यांच्या आगमनाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. शेकडो, हजारो किलोमीटरचा प्रवास करीत युरोप, अमेरिका, मंगोलिया, रशिया, हिमालय अशा भागातून हे पक्षी दाखल झाले आहेत. मात्र अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील तलाव तुडुंब भरले आहेत. दलदलीचा किनारा नसल्याने या प्रवाशांनी येथील तलावाकडे पाठ फिरवली व मुक्काम भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील तलावांकडे वळविला. मात्र आता गोरेवाडा तलाव त्यांच्यासाठी आवडीचा ठरला आहे.
बदक प्रजातीचे बरेच पक्षी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. पट्टकदम हंस, लालसरी बदक, रेड क्रेस्टर्ड पोचर्ड, गढवाल, बॅक टेल (धोबी), युरेशियन व्हिजन, पिनटेल, युरेशियन कूट (चंदेरी बदक) या विदेशी पक्ष्याची जलक्रीडा येथे अनुभवायला मिळते आहे. याशिवाय स्थानिक स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणात आले आहेत. यामध्ये स्पॉट बिल डक, शेकाट्या, पिगमी कॉटन गीज यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पखाले यांनी सांगितले. आता थंडी अधिक पडायला लागली आहे. त्यामुळे या प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
निसर्गचक्रात मोठे बदल दिसून येत आहेत. कधीही पाऊस पडतो. कधी तापमान वाढते तर कधी घटते. स्थलांतराचा सिझन एकसारखा राहिला नाही. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या दरवर्षीपेक्षा कमी कमी होत आहे. मात्र जानेवारीपर्यंत ही संख्या वाढेल अशी आशा आहे.
पांडुरंग पखाले, रेंजर, गोरेवाडा