नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत आहे. आरटीओने याची दखल घेतली असून, प्रवाशांच्या सेवेकरिता वाहने उपलब्ध करून देण्यासाठी स्कूल बस, प्रवासी बस रस्त्यावर उतरविण्याच्या आरटीओ तयारीत आहे.
यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर शहर, ग्रामीण व पूर्व नागपूर या तीनही कार्यालयांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत स्कूल बस संघटना, प्रवासी बस संघटना यांच्या प्रतिनिधींना बोलाविण्यात आले होते. यात संघटनेला उपलब्ध असलेल्या वाहनांच्या संख्येची माहिती देण्याची सूचना करण्यात आली.
स्कूल बस, प्रवासी बसचालकांनी एसटीच्या सध्याच्या भाडेदराप्रमाणे प्रवाशांना विनातक्रार सेवा उपलब्ध करून द्यायची असल्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आला. यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भाडे दरपत्रक उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. आरटीओने तीनही कार्यालयांचे संपकाळात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे.