लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयाची कार अज्ञात आरोपीने पेटवून दिली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले.
लकडगंजमध्ये डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय आहे. प्रशासनाने शाळेच्या कामाच्या वापरासाठी कार (एमएच ३१यएच ५५०६) घेतलेली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रशासनाने कार शाळेच्या आवारात उभी ठेवून कार्यालय बंद केले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास कर्मचारी शाळा उघडण्यासाठी आले असता आवारात ठेवलेली कार जळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी शाळा व्यवस्थापन प्रमुखांना ही माहिती दिली, नंतर लकडगंज पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून चौकशी केली. कार कुणी पेटविली त्याचा शोध घेण्यासाठी आजूबाजूला विचारणा केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र, शाळेचे सीसीटीव्ही बंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी या परिसरातील दुसऱ्या ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेऊन शोध चालिवला. तूर्त शाळेतर्फे आकाश रवींद्र मानकर यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शाळेची कार व्यक्तिगत आकसापोटी पेटविली असावी, असा प्राथमिक संशय असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
---