मंगेश व्यवहारे
नागपूर : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाचे चार ते पाच सर्वेक्षण झाले. सापडलेल्या मुलांना शाळेतही घातले गेले. पण मुले शाळेत टिकली नाहीत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम महिला व बालविकास विभागाने नागपुरात यशस्वी केले. या मुलांसाठी बसमध्येच शाळा तयार केली आणि ती वस्त्यांमध्ये फिरविली. गेल्या ४ महिन्यात २५५ मुले या फिरत्या शाळेत येत असून, प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत.
सुरुवातीला मुलांना बसमध्ये बसविताच पालकांकडून विरोध झाला. आम्ही मुलांना बसमध्ये पकडून नेणार अशी त्यांची भावना होती. त्यामुळे पालक बसभोवती गराडा घालायचे. आम्ही त्यांना शाळेची गोडी लावली. आज शाळा असेल त्या दिवशी मुले नियमित येतात.-दिव्या ठाकरे, शिक्षिका
फिरते पथक हा प्रकल्प रस्त्यावर भटकणाऱ्या, झोपडपट्टी भागातील शिक्षणापासून वंचित मुलांसाठी आहे. शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना जवळच्या शाळेमध्ये समाविष्ट करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे -भारती मानकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
वाड्या-वस्त्यांवर फिरते बसवाठोडा येथील तुलसीनगर झोपडपट्टी, शीतला माता झोपडपट्टी, संत्रा मार्केट रेल्वेस्थानक, राजनगर झोपडपट्टी, भांडेवाडी, ताजबाग, यशोधरानगर, कळमना, हिंगणा, यशवंत स्टेडियमच्या भागात एक पिवळ्या रंगाची बस उभी असते. या बसमध्ये मुलांना बसण्यासाठी डेक्सबेंच, शिकवायला फळा आहे. बसमध्ये सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम आहे. बालस्नेही वातावरण राहील याची काळजी घेण्यात आली आहे. दररोज दोन वस्त्यांमध्ये ही बस फिरते.