निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मुलांच्या आनंदाचे पर्वच जणू. सुट्यांमध्ये मुलांकडे असलेल्या निवांत वेळेचा सदुपयोग व्हावा याकडे पालकांचा विशेष कल असतो. सुटी आणि शिबिरे हे जणू एक समीकरणच आहे. अनेकांचे तर प्लॅनिंगही ठरले असते. याच काळात शहरात अनेक संस्थांकडून उन्हाळी शिबिरे घेतली जातात. अनेक उच्चभ्रु शाळांकडूनच अशी शिबिरे राबविली जातात. गिर्यारोहणासारखे साहसिक शिबिरे किंवा कलागुणांना वाव देणारी छंद शिबिरे. मात्र अशा शिबिरांसाठी पैसाही मोजावा लागतो. श्रीमंत मुलांसाठी हे सहज शक्य आहे. मात्र सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी अशी उन्हाळी, छंद शिबिरे कल्पना मात्र असते. अशा वंचित अवस्थेत जीवन जगणाऱ्या मुलांसाठी संवेदनशील तरुणांच्या ‘परिंदे’ ग्रुपने नि:शुल्क उन्हाळी शिबिर सुरू केले आहे.परिंदे हा उच्च शिक्षण घेतलेल्या व काही जॉब करणाऱ्या तरुणांचा ग्रुप आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या मुलांप्रति त्यांच्यात संवदेनशीलता आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक अनाथाश्रमांच्या मुलांसाठी विविध उपक्रम परिंदे ग्रुपतर्फे नियमितपणे राबविली जातात. याच ग्रुपने अभावात जगणाऱ्या गरीब मुलांसाठी गेल्या तीन वर्षापासून उन्हाळी शिबिर घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या शिबिराला ‘मस्ती की पाठशाला’ असे नाव दिले असून, हे शिबिर अजनी रेल्वे मेन्स येथे सुरू आहे. इयत्ता तिसरी ते नववीपर्यंत वर्गातील २५० च्या जवळपास मुले शिबिरात आहेत. यामध्ये विविध शाळांसह जे शाळेतच जाऊ शकत नाही, अशा मुलांचाही समावेश आहे. परिंदे ग्रुपच्या अवि अग्रवाल याने माहिती देताना सांगितले, शिबिरामध्ये मुलांसाठी विविध प्रकारचे नृत्य, रांगोळी, मेहंदीच्या पद्धती, क्ले मॉडेलिंग, चित्रकला, फन सायन्स, आर्ट आॅफ लिव्हिंग, टेलिग्राफी अशा विविध अॅक्टीव्हीटी मुलांकडून करून घेतल्या जातात. यासाठी प्रोफेशनल शिक्षकांचे मार्गदर्शनही केले जाते. हे शिक्षकही सामाजिक भावनेतून नि:शुल्क सेवा देत आहेत. नुसते शिकविणे नाही तर आनंददायी वातावरणात हे करवून घेतले जात आहे. मुलेही दररोज आनंदाने व उत्साहाने यामध्ये सहभागी होत आहेत. १५ दिवसाच्या प्रशिक्षणानंतर २ मे रोजी मुलांची स्पर्धा घेतली जाणार असल्याचे अविने सांगितले. शिबिरातील प्रशिक्षणातून या मुलांना जगण्याची नवी वाट मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
अनाथाश्रमांच्या मुलांसाठीही घेणार शिबिरअविसह निरंजन जाधव, रेशम नोटानी, हर्षल ठाकरे, ऋची छाबरा, तनय कांडगे व ग्रुपच्या ३५ तरुणांचा या आयोजनात सहभाग आहे. या शिबिरात मार्गदर्शनासाठी येणारे शिक्षक नि:शुल्क सेवा देत असून, अनेक संवेदनशील व्यक्तींनी मुलांच्या खर्चाची जबाबदारी घेतल्याचेही अविने स्पष्ट केले. हे शिबिर संपल्यानंतर शहरातील अनाथाश्रमातील मुलांसाठीही लवकरच अशाप्रकारचे शिबिर घेण्यात येणार असून, त्याची योजना तयार केल्याचे त्याने सांगितले. याबाबत महिला व बालकल्याण विकास संस्थेशी बोलून कार्यक्रम निश्चित करणार असल्याचेही अवि अग्रवालने सांगितले.