नागपूर : पाच वर्षांपासून एका शाळकरी मुलीचे शोषण करणाºया नराधमाला गिट्टीखदान पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. किशोर कमलाकर पाटील (वय ४५) असे या आरोपीचे नाव असून तो एका शाळेत शिपायी म्हणून नोकरी करतो. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गिट्टीखदान परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.पीडित मुलगी सध्या १३ वर्षांची असून, ती ९ वीत शिकते. मुलीची आई नोकरी करते. तिला एक छोटी बहीण आहे. तिची आई कर्तव्यावर गेल्यानंतर आरोपी पाटील बालिकेच्या घरात शिरून तिचे लैंगिक शोषण करायचा. २० जानेवारी २०१३ ला त्याने सर्वप्रथम कुकर्म केले. त्यावेळी त्याने बालिकेला धमकी देऊन आईला हा प्रकार सांगितल्यास ठार मारेन, असा धाक दाखवला. त्यामुळे बालिका गप्प राहिली. एक दिवस असह्य त्रास झाल्याने तिने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यामुळे आईने आरोपीला विचारणा केली असता त्याने चक्क नकार दिला. एवढेच नव्हे तर बालिकेला बेदम मारहाण करून आईजवळ सांगितलेला प्रकार खोटा आहे, असे सांगण्यास बाध्य केले. परिणामी मुलीने आपल्या आईला असे काही नाही, असे सांगितले. त्यावेळी आईने तिला ह्यऐसी बाते गंदी बच्चीयां करती है. आप फिरसे ऐसी बाते मत करना, असे समजावून सांगितले. त्यावेळपासून बालिका दहशतीत आली. इकडे आरोपी निर्ढावला. तो संधी मिळेल तेव्हा बालिकेचे शोषण करायचा. तब्बल पाच वर्षांपासून त्याचा अत्याचार सहन करणा-या बालिकेची मानसिक स्थिती त्यामुळे बिघडली.अशी फुटली कोंडीघरात अन् शाळेत ती गप्प राहायची. कुणाशीच जास्त बोलत नव्हती. आईला खरा प्रकार सांगितला तर ती विश्वास ठेवणार नाही, याची तिला जाणीव होती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याने ती वैफल्यात गेली. ती एकांतात घरी स्वत:च्या हातावर ब्लेडने चिरे मारून घेत होती. तिच्या वर्गमैत्रिणींच्या लक्षात तिची स्थिती आल्याने त्यांनी तिला बोलते केले. त्यानंतर या संतापजनक प्रकाराला वाचा फुटली. मैत्रिणींनी वर्गशिक्षिकेला आणि वर्गशिक्षिकेने प्राचार्यांना ही माहिती दिली.शाळा प्रशासनाची तत्परताप्राचार्यांनी या गंभीर प्रकाराची तत्परतेने दखल घेत मुलीच्या आईला बोलवून घेतले. त्यांना विश्वासात घेत सर्व गैरप्रकार सांगितला. हा घटनाक्रम ऐकून आईचीही मानसिक अवस्था बिघडली. दोन्ही मायलेकींना डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचारासोबतच या दोघींचे समुपदेशन केले. त्यानंतर आरोपीला रंगेहात पकडण्याची योजना बनविण्यात आली.नराधम पकडला गेला१७ डिसेंबरला आई कर्तव्यावर जाते असे सांगून घरातच लपून बसली. मुलीची आई कर्तव्यावर गेल्याचा अंदाज बांधून नराधम पाटीलने बालिकेसोबत कुकर्म करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आईने तेथे जाऊन त्याचे थोबाड रंगविले. त्यानंतर हे प्रकरण बालकल्याण समितीकडे नेण्यात आले. बालकल्याण समितीने चौकशी केल्यानंतर शनिवारी रात्री गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक शालिनी किन्नाके यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे, तिला धमकी देणे आदी आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करून त्याचा २४ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.
शाळकरी मुलीवर पाच वर्षांपासून अत्याचार, नराधम गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 9:00 PM