नागपूर : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका तरुणाशी संवाद साधणे एका शाळकरी विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले. आरोपी तरुणीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता त्याने तिच्या फोटोचे मॉर्फिंग करण्याची धमकी दिली. पोलिसांनी या रोडरोमियोला अटक केली आहे.
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. १६ वर्षीय विद्यार्थिनीची पवन प्रवीण लांबट (२३, पारडी) या तरुणाशी ओळख होती. दोघेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२२ मध्ये परत संपर्कात आले. त्यानंतर त्याने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला व तिचा पाठलाग करू लागला. ‘तू मला खूप आवडतेस व माझ्याशी फ्रेंडशीप कर’ असा तगादा त्याने लावला. तिने त्याला नकार दिला असता त्याने तुझा फोटो मॉर्फ करून व्हायरल करेल व बदनामी होईल, अशी धमकी दिली.
शुक्रवारी विद्यार्थिनी शाळेत जात असताना पवनने तिचा पाठलाग केला व तिला रस्त्यात थांबवून तिचा हात पकडला. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. मुलीने पारडी पोलीस ठाण्यात पवनविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.