आम्ही चाचण्या करतो, विद्यार्थ्यांचे काय? : शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांमध्येही नाराजी
नागपूर : ५ महिन्यापासून घरात बसून खात आहेत, असा आमच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे आम्ही विरोध तरी कसा करावा, मात्र आम्ही विद्यार्थी हित जाणतो. विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा शाळा महत्त्वाची नाही. सरकारने सांगितल्यानुसार आम्ही चाचण्या करूनही घेत आहोत. पण विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल करीत शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
२३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होत असल्याने २२ पर्यंत शिक्षकांना कोरोनाची चाचणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाला द्यायचा आहे. शुक्रवारपर्यंत नागपूर शहरातील ३० टक्के शिक्षकांनी कोरोनाची चाचणी केली होती. शनिवारी मात्र शहरातील सर्वच चाचणी केंद्रावर शिक्षकांची गर्दी झाली होती. नागपूर शहरात ९ ते १२ वर्गाच्या ५९३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यात जवळपास ६२५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील काही चाचणी केंद्रावर भेट दिली असता, शिक्षकांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. आम्ही चाचण्या केल्या मात्र विद्यार्थ्यांच्या चाचण्यांचे काय? एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर अख्ख्या शाळेला त्याचा धोका आहे. इतर राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर काय? परिस्थिती झाली, याचा आढावा सरकारने घ्यायला हवा होता. ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. आपत्कालीन स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. आम्हाला शिकवायला काहीच हरकत नाही. पण विद्यार्थ्यांच्या जीवाचे बघा, असा सल्ला शिक्षकांनी दिला.
- कोरोनाच्या भीतीपोटी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केले. मग विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा भरविण्याचे काय औचित्य आहे. आमदार, मंत्री, अधिकारी यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो तर विद्यार्थ्यांच्या जीवाला का नाही?
डॉ. जयंत जांभुळकर, महासचिव, काँग्रेस शिक्षक सेल
- डिसेंबरपर्यंत शाळा सुरू झाल्या नसत्या तरी काहीच फरक पडला नसता. महामारीच्या परिस्थितीत शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवर उगाच प्रयोग करीत आहे. १०० वर्षातून अशी परिस्थिती एखाद्यावेळी येते. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे सरकारचे काम आहे.
योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
- सरकारने शाळा सुरू करण्याचा अट्टहास धरून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. आमचे म्हणणे आहे ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू करू नये. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जीवास काही झाल्यास आम्ही शासन व प्रशासनाच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवू.
नागो गाणार, शिक्षक आमदार