लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल टॉवर लावून दर महिन्याला एक ते दीड लाख रुपयाच्या कमाईचे आमिष दाखवून एका शाळेच्या चपराशास सव्वा चार लाखाचा चुना लावण्यात आला.देवमन माकडे रा. कंट्रोल वाडी हे शाळेत चपराशी आहे. अमरावती रोडवर त्यांचा प्लॉट आहे. त्यांनी मोबाईल टॉवर लावून दर महिन्याला लाखो रुपये कमावण्याची जाहिरात पाहून आरोपीशी संपर्क साधला. आरोपींनी त्यांना प्लॉटवर मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमिष दिले. टॉवरच्या भाड्यापोटी दर महिन्याला एक ते दीड लाख रुपये मिळतील, असे सांगितले. यासाठी कंपनीच्या अटीअंतर्गत सिक्युरिटी डिपॉझिट आणि इतर खर्चाच्या नावावर पैसे जमा करायला सांगितले.आरोपींनी माकडे यांना बँक खाता क्रमांक देऊन त्यात पैसे जमा करण्यास सांगितले. माकडे यांनी २८ जुलै २०१८ ते २० जानेवारी २०१९ पर्यंत ४ लाख २० हजार ७०० रुपये जमा केले. यानंतरही आरोपी त्यांना पैसे जमा करण्यास सांगू लागले. परंतु माकडे यांनी सोसायटीतून कर्ज घेऊन ते पैसे भरल्याने त्याला आणखी पैसे भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. तेव्हा माकडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वाडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांच्या मोबाईल नंबरवरून ते दिल्लीतील असल्याचे आढळून आले. दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत.