नागपूर - जिल्हा परीषद शिक्षकांच्या करण्यात आलेल्या ऑनलाईन बदल्यात प्रचंड घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात ८५ शाळा शिक्षकाविना असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. नागपूर अधिवेशनावेळी सभागृहाबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिक्षकांच्या झालेल्या ऑनलाईन बदल्यात शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याने प्रशासनाला बदली करताना सत्यता तपासता आली नाही. तर अवघड क्षेत्रातील ४४ शिक्षकांची बदली होऊ शकली नाही. आज गडचिरोलीतील शाळांची परिस्थिती शिक्षकांविना बिकट झालेली आहे. विद्यार्थी वर्गात येतात पण त्यांना शिकवायला शिक्षकच उपस्थित नसतात. यासंदर्भात शासनाकडे आमचा सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून विद्यार्थी व पालक यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.