लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईला जाऊन हिरो बनण्याचे स्वप्न तीन जीवलग मित्रांनी पाहिले. मुंबईला जाण्यासाठी तयारी केली. रेल्वेने जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानक गाठले. परंतु शाळेच्या गणवेशात असल्यामुळे एका टीसीची त्यांच्यावर नजर गेली. विचारपूस केल्यानंतर सत्यस्थिती पुढे येताच या अल्पवयीन बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात आले.मोबाईल आणि टीव्हीच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. ज्ञानात भर पडते. मात्र, अलीकडे अल्पवयीन बालक या माध्यमांचा वाईट गोष्टीसाठीच उपयोग करीत असून, ते भरकटत चालले आहेत.नागपुरातील तीन अल्पवयीन मुले एकाच परिसरात राहतात. त्यांची चांगली मैत्री आहे. तिघेही ८ आणि ९ व्या वर्गात शिकतात. सोबतच शाळेत जातात. सोमवारी नेहमीप्रमाणे तिघेही सकाळी ११ वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले. मोबाईल आणि टीव्हीच्या प्रभावामुळे त्यांनी हिरो बनण्याचे ठरविले. त्यांनी मुंबईला जाण्याची योजना आखली. त्यासाठी एका विद्यार्थाने घरून तीन हजार रुपये घेतले अन् तिघेही थेट नागपूर रेल्वेस्थानकावर आले. त्यांनी मुंबईला जाण्यासाठी तिकीट घेतले. गाडीच्या प्रतीक्षेत त्यांनी कॅन्टीनमध्ये जेवण केले. प्लॅटफार्म क्रमांक १ वर गाडीची वाट पाहत असताना एका कर्तव्यदक्ष टीसीचे लक्ष त्यांच्याकडे गेले.शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी आणि त्यांच्याकडे कोणतीही बॅग नसल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी लगेच मुलांची विचारपूस केली असता, त्यांनी हिरो बनण्यासाठी मुंबईला जात असल्याची कबुली दिली. तिघांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीकडे सोपविण्यात आले.चाईल्ड लाईनने लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. सहायक निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली. लगेच त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून ठाण्यात बोलाविले. तिघांचेही पालक आल्यानंतर मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
हिरो होण्यासाठी शाळकरी मुलांनी गाठले रेल्वेस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:20 AM
मुंबईला जाऊन हिरो बनण्याचे स्वप्न तीन जीवलग मित्रांनी पाहिले. मुंबईला जाण्यासाठी तयारी केली. रेल्वेने जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानक गाठले.
ठळक मुद्देटीसीची समयसूचकता रेल्वे चाईल्ड लाईनच्या दिले ताब्यात