नागपूर : केंद्रीय विद्यापीठांप्रमाणेच राज्य विद्यापीठांमध्ये देखील आता शाळा प्रणाली सुरू केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा उच्च शिक्षणातील शाळा प्रणाली समितीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी दिली. उच्च शिक्षणातील शाळा प्रणाली बाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रामानुजन सभागृह येथे आयोजित कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत डॉ. थोरात मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे होते.
देशासह महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात शाळा प्रणाली लागू केली जाणार असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. राज्य विद्यापीठामध्येही ‘शाळा प्रणाली’ येत असून त्यात एकूण १४ शाळा अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. शिवाय या शाळा प्रणालीची कार्यपद्धती व संरचना याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्य समिती सदस्य परविन सईदा यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवून श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तरे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात सदर पद्धती आवश्यक असून लगतच्या काळात कधीही लागू होऊ शकते. करिता विभागांनी तयार राहावे अशी सूचना केली. संचालन डॉ. श्याम कोरेटी यांनी केले