नागपूर : लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यामुळे स्कूल व्हॅन चालक, तसेच ऑटो चालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने स्कूल व्हॅन चालक, तसेच ऑटो चालकांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. यात शाळा बंद असल्यामुळे, शाळकरी मुलांची वाहतूक करणारे स्कूल व्हॅनचे चालक संकटात सापडले आहेत. दीड वर्षांपासून मुलेच शाळेत जात नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा यक्ष प्रश्न त्यांना पडला आहे, तर ऑटो चालकांची परिस्थितीही गंभीर झाली आहे. लॉकडाऊनमुळे बसेस, रेल्वेगाड्या बंद आहेत. मोजक्याच बसेस आणि रेल्वेगाड्या सुरू असल्यामुळे प्रवासी मिळत नाहीत. अशा स्थितीत घरखर्च, मुलांचे ऑनलाइन शिक्षण कसे करावे, या विवंचनेत ऑटो चालक सापडले आहेत. शासनाने त्यांना १,५०० रुपयांची आर्थिक मदत केली आहे, परंतु ही मदत अपुरी असून, त्यात काहीच भागत नसल्याचे ऑटो चालकांचे म्हणणे आहे. शासनाने अशा कठीण परिस्थितीत ऑटो चालक, तसेच स्कूल व्हॅन चालकांना ठोस मदत करण्याची मागणी ते करीत आहेत.
...........
शाळा सुरू होण्याची वाट
‘शाळा बंद असल्यामुळे स्कूल व्हॅन दीड वर्षापासून बंद आहे. उदरनिर्वाहासाठी काही दिवस ऑटो चालविला, परंतु ऑटोही बंद झाल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी एका मालवाहू वाहनावर पार्ट टाइम जॉब करीत आहे. शाळा सुरू कधी होणार, याची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.’
- धनराज चाफेकर, स्कूल व्हॅन चालक
स्कूल व्हॅनचे कर्ज फेडण्याची चिंता
‘कर्ज काढून स्कूल व्हॅन घेतली असल्यामुळे खासगी फायनान्स कंपनीचे पैसे थांबले आहेत. फायनान्स कंपनीवाले व्याजदर कमी करण्यास तयार नाहीत. मिळेल ते काम करावे लागत आहे. मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. दर महिन्याला २५ ते ३० हजार उत्पन्न होत होते, पण आता ५ हजार कमविणे मुश्कील झाले आहे. घरखर्च चालविणे कठीण झाले.’
- सुनील भोसले, स्कूल व्हॅन चालक
शासनाची मदत अपुरी
गाड्या बंद नसल्यामुळे ऑटोचालकांची अवस्था गंभीर आहे. महिन्याला ३० हजार रुपये महिना मिळत होता. आता ५ हजार महिन्यांचे मिळत नाहीत. घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. मुलांचे शिक्षण, ऑनलाइन शिक्षणाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे. शासनाने १,५०० रुपये दिले, परंतु ही अपुरी मदत असून, ऑटोचालकांसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
- अल्ताफ अंसारी, ऑटो चालक
दिवसभर उन्हात बसूनही प्रवासी मिळेनात
‘सकाळी ऑटो घेऊन घराबाहेर पडतो. दिवसभर उन्हात बसूनही प्रवासी मिळत नाहीत. पेट्रोलचा खर्च जाऊन केवळ १०० रुपये उरते. घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. घरी शिक्षण घेणारी मुले आहेत. त्यामुळे मी दुहेरी संकटात सापडलो आहे.’
संतोष तिवारी, ऑटो चालक