नागपूर : पालकांचा विश्वासघात करून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाला सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. के. जी. राठी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीत घडली होती.
आशिष मनोहर वर्मा (३०) असे आरोपी व्हॅन चालकाचे नाव असून तो अजनी चौक परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी सहा वर्षे वयाची होती. ती इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. पालकांनी पीडित मुलीसह तिच्या भावाला शाळेत सोडून देण्यासाठी व शाळेतून घरी आणण्यासाठी आरोपीच्या व्हॅनची सेवा घेतली होती.
आरोपी दोन्ही मुलांना रोज सकाळी ८ वाजता घरून घेत होता व दुपारी ३.१५ वाजेपर्यंत घरी आणून सोडत होता. परंतु, तो ८ व ९ जुलै २०१९ रोजी मुलांना घेण्यासाठी आला नाही. त्यामुळे ९ जुलै रोजी वडिलाने मुलांना शाळेत सोडून दिले. त्या दिवशी आरोपी दुपारी शाळेत गेला व मुलांना घरी सोडून देत असल्याचे वडिलाला कळविले.
दरम्यान, आरोपीने इमामवाडा परिसरात पीडित मुलीला चिप्सचे पॉकेट खरेदी करून दिले व तिच्यावर व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.