नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पण हे शिक्षण मुलांबरोबरच पालकांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. शाळा होती तर बरं होतं असा सूर आता पालकांमधून निघत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. मुलांना घरी सांभाळतांना पालकांच्याही नाकीनऊ आल्या आहेत. मुलांना मोबाईलची सवय लागली असून, त्यांना या सवयीपासून कसे दूर करावे, अशी चिंता पालकांना भेडसावत आहे.
कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. पालक आणि मुले घरी असल्याने मुलांना वाटायला लागले आहे की पालकांचा जास्त हस्तक्षेप वाढत आहे. दुसरीकडे पालकांची गोची झाली की मुले शिक्षणाच्या नावाखाली दिवसभर मोबाईलवर व्यस्त असतात. ऑनलाईनमुळे क्वॉलिटी एज्युकेशन मिळत नसल्याची चिंता पालकांना भेडसावत आहे. जास्त वेळ मुले पालकांच्या संपर्कात असल्याने मुलांची चिडचिड वाढली आहे. ते पालकांच्या तोंडाला तोंड देऊ लागले आहेत.
- दृष्टीक्षेपात
नागपुरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या
८,७२,६३२
- मुलांच्या समस्या
१) शाळा बंद असल्याने मुले घरीच राहून खाणे, झोपणे, मोबाईलवर गेम खेळणे इथपर्यंत सिमित झाली आहेत.
२) मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. चिडचिडेपणा वाढला आहे. आग्रह, हट्ट करायला लागली आहे. त्यांना घरातच असल्याने कंटाळा येऊ लागला आहे.
३) मुले एकलकोंडी, बुजरी झाली आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास हरवला आहे. मुलांची दैनंदिनी बिघडल्याने आजार वाढले आहेत.
- पालकांच्या समस्या
२) मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुले ऐकतच नाहीत अशी ओरड पालकांकडून होत आहे.
२) ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना वाईट सवयी तर लागणार नाहीत ना? अशी भीती पालकांमध्ये आहे. घरात असताना ती आमच्यासोबत बोलतच नाहीत. सतत मोबाईलमध्ये राहते, अशा पालकांच्या तक्रारी आहेत.
३) ऑनलाईन एज्युकेशन हे क्वॉलिटी एज्युकेशन नाही, हे पालकांना कळले आहे. मुलांमध्ये शिस्त राहिलेली नाही. अभ्यासाचे गांभीर्य नाही अशा पालकांच्या तक्रारी आहेत.
- सततच्या बंधनात मानसिकता खालावते. लहान मुलांना मुक्तसंचार आवडत असतो. मात्र, कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुले मोबाईलवर अभ्यास करीत आहेत. त्यांचा स्क्रीन टाईम वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शाळा होती तर ८ तास मुले शाळेत रहायची. आता तर टीव्ही, मोबाईल यात गुरफटलेली असल्याने आता पालकही चिडायला लागले आहे.
सोनाली गुरवगुर, वरिष्ठ समुपदेशक