नागपूर : नंदनवन येथील स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलला सीबीएसईची मान्यता नसतानाही पालकांची दिशाभूल करून ‘फी’ वसूल केली जात होती. शाळेसंदर्भात पालकांकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत शाळेचा मोठा भंडाफोड झाला आहे. दिशाभूल केल्याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलकडे सीबीएसईची मान्यता नसतानाही गेल्या सत्रात शाळेने विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे शाळेच्या तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित केली. या चौकशीत शाळेच्या बाबतीतील अनियमितता पुढे आली.
शाळेने अभ्यासक्रमात खाजगी प्रकाशनाची पुस्तके लागू केली होती. शाळेत प्रयोगशाळेची स्वतंत्र खोली व खेळाचे मैदान उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांकडून सक्तीने अॅक्टिव्हिटी फी वसूल करण्यात येत होती. शाळेत पीटीए, ईपीटीए शासन नियमानुसार गठित केलेली नव्हती. शाळा सीबीएसई अभ्यासक्रमासाठी सुरू केली; पण शाळेला सीबीएसईची संलग्नता नाही. शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंत खाजगी प्रकाशनाची पुस्तके उपयोगात आणली जातात. आठवी ते दहावी वर्गाला एनसीईआरटीची पुस्तके वापरतात. अशा अनेक अनियमितता चौकशीत पुढे आल्या आहेत.
- शाळेला वर्ग नऊ व दहावीची मान्यताच नाही
चौकशीत अधिकाऱ्यांना आढळले की, शाळेला वर्ग नऊ व दहावीची मान्यता नाही. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी शाळेच्या कामठी येथील शाखेतून परीक्षेला बसत होते. शासनाच्या २ ऑगस्ट २०१३ च्या पत्रावरून परवानगी आहे हे गृहीत धरून एकदाच मान्यता दिली आहे.
- या शाळेच्या अनियमिततेसंदर्भात आम्ही विभागीय शिक्षण उपसंचालकांपुढे सुनावणी लावली होती. चार दिवसांपूर्वी या शाळेला खाते मान्यता मिळाली, असे लक्षात आले. या शाळेने शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे. पालकांची, विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. बोगस पद्धतीने शाळा चालविताना पालकांकडून मनमानी फी वसुली केली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व शाळेची मान्यता रद्द करावी.
-मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अॅक्शन कमिटी