नागपूर : मागील दोन वर्षांपासून झळ सोसणाऱ्या नागपुरातील स्कूल बस आणि व्हॅन चालक व मालकांनी मंगळवारी सकाळी फायनान्स कंपनीसह आरटीओ कार्यलय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या व्यथा ऐकविल्या. शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बचाव संघर्ष समितीच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता यशवंत स्टेडियम येथे नागपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी वाहतूकदार आपल्या वाहनांसह यशवंत स्टेडियमजवळ गोळा झाले. त्यानंतर शंकरनगरातील चोला फायनान्स कंपनी, गिरीपेठ येथील परिवहन कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाने निवेदन दिले आणि प्रशासनापुढे आपले म्हणणे मांडले.
समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जंगले यांनी प्रशासनापुढे बाजू मांडली. मार्च २०२० पासून सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय बंद पडला आहे. स्कुलबस आणि व्हॅन उभ्या असल्याने फायनान्स कंपनीचे हप्ते थकले. आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सरकारतर्फे सहा महिने मोनोटोरिअमचा फायदा फायनान्स कंपन्यांनी घेऊन या व्यावसायिकांवर त्या कालावधीचा अतिरिक्त व्याज आकारल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. काही फायनान्स कंपन्यांनी आपले कर्ज सुरक्षित करण्यासाठी गाडी मालकाला नव्याने अतिरिक्त हप्ता आखून कर्जात ढकलल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या पठाणी वसुली पद्धतीवरही आंदोलकांनी चर्चेदरम्यान आक्षेप घेतला. घरोघरी वसुलीसाठी करायला पाठवीत आहेत तसेच धमकावून गाड्या उचलून जमा करीत असून मुंबई, कोलकाता येथील कोर्टात हजर समन्स पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले. परिवहन विभागाकडून टॅक्स वसुलीकरिता मागणीचे नोटिसेस पाठवून मानसिकदृष्ट्या दुर्बल केले जात असल्याची व्यथा मांडण्यात आली. शिष्टमंडळात महेश बुरबुरे, कपिल खाडे, निशांत साखरे, हेमंत गजभिये, हेमंत सुरकर, कल्लू दुबेजी, शैलेश पांडे, मोहन बेलसरे, पंकज डहाके, राजेश रंगारी आदींचा समावेश होता.