लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसाठी पुढील आठवडा महत्त्वपूर्ण असून रुग्णसंख्येत वाढ बघून जिल्ह्यातील शाळांना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. २६ जानेवारी रोजी यासंदर्भात पुढील निर्णय जाहीर होईल. तोपर्यंत शाळा बंद असेल. २६ जानेवारी नंतरच शाळा संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. शनिवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
पालकमंत्री राऊत यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच प्रमुख हॉस्पिटलचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
रुग्ण संख्या वाढत असली तरी तूर्तास निर्बंध कठोर करण्यात येणार नाही. उद्योग-व्यापार बंद करण्याची सध्या तरी गरज नाही. जिल्ह्यातील नियंत्रणासाठी काही दिवसात विविध घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. रुग्णवाढ रोखण्यासाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, प्रशिक्षण बंद ठेवण्याऐवजी समाजातील या सर्व घटकांसोबत संवाद साधण्यात येतील. माध्यमातील मालक, संपादकांशी देखील चर्चा करण्यात येणार असल्याचे असे राऊत यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत एकही डोस न घेतलेले नागरिक शोधून त्यांचे लसीकरण करणे, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दंडात्मक कारवाईची संख्या वाढविणे, आरोग्यमित्र संकल्पना वाढवून प्रचार-प्रसार करणे, कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टम सुरु करणे, कोविड सेल्फ किट संदर्भात अन्न व औषधी प्रशासनाने नोंदी ठेवण्याचे निर्देश देण्यात देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या प्रभागात रुग्ण वाढत आहे, त्या प्रभागावर आणि मास्क न लावणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
- सतरा हजार बेड्स उपलब्ध
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढीचा दर कायम राहणार आहे. रुग्णवाढ असली तरी रुग्ण गंभीर होऊन दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मृत्यूदर सुद्धा कमी आहे. मेडिकल, मेयो व गरज पडल्यास एम्समध्ये आजमितीला सतरा हजारावर बेड्सची उपलब्धता आहे. ऑक्सिजनची क्षमतादेखील कोणत्याही आणीबाणीला तोंड देण्यास पुरेशी आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितले.