लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत
पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, पोलीस यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळा सुरू करण्याबाबतचा प्रश्न पुढे आला. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोनासंदर्भातील चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे सीईओ कुंभेजकर यांनी सांगितले. तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीदेखील झाल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिक्षकांनी अतिशय सकारात्मकपणे शाळा सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले. कोरोनासंदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी सार्वत्रिक भावना असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनासंदर्भात आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम, अटी पाळून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळांमध्ये शिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा सुरू करण्याबाबत ग्रामीण भागातील पालकांची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. शहरी भागातील शाळाही लवकरच सुरू व्हाव्यात, असेही ते म्हणाले. त्यामुळे १४ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मनपा क्षेत्रातील शाळा मात्र डिसेंबरअखेरीस सुरू करण्यात येतील, अशी माहिती यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा १ जानेवारीपासून मनपा क्षेत्रातील शाळाही सुरू होतील, असे संकेत यावेळी देण्यात आले.