लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर शहराच्या हद्दीतील सर्वच शाळा व कनिष्ठ महाविद्यालये १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट परतण्याचा धोका विचारात घेता शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी रात्री यासंबंधीचा आदेश जारी केला. तर, नागपूर ग्रामीण मधील शाळा मात्र सोमवारपासून उघडणार आहेत. चाचणीत काही शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याची अपेक्षा होती. या शिक्षकांना वगळून शाळा सुरू केल्या जातील, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील शाळा बंद व ग्रामीणमधील सुरू असा विरोधाभास प्रसासकीय पातळीवर दिसून आला आहे. ग्रामीणमधील शाळाही बंदच ठेवाव्या, अशी आग्रही मागणी शिक्षक व पालकांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळांचे निजंर्तुकीकरण सुरू असतानाच, शनिवारी रात्री १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश राधाकृष्णन बी. यांनी काढले आहेत. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत.
....
पुरवणी परीक्षा ठरल्यानुसार सुरू राहतील
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्व नियोजित सुरू असणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील. या आदेशाची तात्काळ अमंलबजावणी सर्व संबंधितांनी करावी. त्याबाबतचे सर्व समन्वयन व संनियंत्रण, महापालिका व जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी करावे. या आदेशाची अंमलबाजणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.