नागपूर : शहरातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण मिळावे, या हेतूने शहरातील सर्व प्रभागात महापालिकेच्या १८६ शाळा आहेत. काही शाळांतील पटसंख्या चांगली आहे. परंतु बहुसंख्य शाळांचा दर्जा चांगला नाही. याचा पटसंख्येवर परिणाम होतो. ही बाब विचारात घेता शिक्षण समितीने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थ्याना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात पिण्याचे शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करणे, बसण्यासाठी डेस्क-बेंच, शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी, इंग्रजी, गणित व विज्ञान यासारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करणे, वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन, महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन, २६ जानेवारी व १५ आॅगस्टला विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण, शाळांना संगणक उपलब्ध करणे, अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती तसेच महत्त्वाच्या शाळांत थम मशीन बसविण्यात येणार आहे. शिक्षण समितीने या बाबतचा कृती आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या शाळांत प्रामुख्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. आजच्या स्पर्धेत महापालिकेचे विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)थम मशीन लागणार४महापालिकेच्या शाळा चांगल्या ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबतच प्रभागातील नगरसेवकांचीही आहे. प्रभागातील शाळांची नगरसेवकांनी वेळोवेळी पाहणी करावी, असे आवाहन शिक्षण समितीने केले आहे. शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थीही उशिरा शाळेत येतात. अशा स्वरूपाच्या पालकांच्या तक्रारी आहेत. याचा विचार करता पटसंख्या अधिक असलेल्या शाळांत थम मशीन लावण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षकांना प्रशिक्षणशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्कृष्ट निकाल लागणाऱ्या शाळांतील शिक्षकांचा गौरव ,तसेच विद्यार्थ्यांत खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व सत्कार केला जाईल. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील वर्षात त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. -गोपाल बोहरे, शिक्षण सभापती, महापालिका
मनपा सुधारणार शाळा
By admin | Published: March 15, 2016 5:05 AM