अनुपम अग्निहोत्री : ‘नीरी’चे हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण नागपूर : आपल्या देशात आजवर वैज्ञानिक क्षेत्राकडे दुर्लक्षच झाले. एकूण ‘जीडीपी’च्या केवळ ०.८ टक्के रक्कम संशोधन व विकास उपक्रमांवर खर्च करण्यात येते. अशा स्थितीत २०२२ पर्यंत संशोधन क्षेत्रात अग्रेसर देश बनणे मोठे आव्हानच आहे. मात्र येत्या काळात चित्र पालटण्याची चिन्हे आहेत. वैज्ञानिक अभ्यासासाठी यंदा अर्थसंकल्पात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. लवकरच वैज्ञानिक क्षेत्राला ‘अच्छे दिन’ येतील, असे मत ‘जेएनएआरडीडीसी’चे (जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्चचे डेव्हलपमेंट अॅन्ड डिझाईन सेंटर) संचालक डॉ.अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) स्थापनेला शनिवारी ५९ वर्ष पूर्ण झाली व हीरक महोत्सवी वर्षात संस्थेने प्रवेश केला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ‘नीरी’च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. देशात संशोधनावर खर्च होणाऱ्या एकूण निधीपैकी ७० टक्के सरकारतर्फे तर अवघा ३० टक्के निधी खासगी क्षेत्रातर्फे खर्च करण्यात येतो. मात्र अमेरिका, जर्मनी, जपानसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये हेच प्रमाण नेमके उलटे आहे. ‘सीएसआयआर’ला मिळणाऱ्या निधीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली नाही. मात्र येत्या काळात नक्कीच चित्र बदललेले दिसेल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन डॉ.अग्निहोत्री यांनी केले. जग आता चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असून पुढील काळाची गरज लक्षात घेऊन सौरऊर्जा व विद्युत वाहनांवर ‘नीरी’ने जास्तीत जास्त भर द्यायला हवा. गेल्या ५९ वर्षांत ‘नीरी’ची सातत्याने प्रगती झाली असून बदलत्या काळासोबत संस्थेत आवश्यकतेनुसार बदल झाले ही स्वागतार्ह बाब आहे, असेदेखील ते म्हणाले. डॉ.राकेश कुमार यांनी ‘नीरी’च्या कार्याबाबत माहिती दिली. ‘नीरी’तर्फे वायूप्रदुषण नियंत्रण आणि हवामान बदल, कचरा कमी करणे तसेच नद्यांचे पुनरुज्जीवीकरण यावर कार्य करत आहे. कौशल्य विकासातदेखील संस्थेने पाऊल ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळांशी संबंधित प्रदूषणाच्या समस्यांच्या निराकरणासंदर्भात ‘जीविका’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘नीरी’च्या हीरकमहोत्सवी वर्षाचा ‘लोगो’चेदेखील उद्घाटन करण्यात आले. विषाक्त कचरा व्यवस्थापनासंदर्भातील पुस्तिकेचेदेखील विमोचन करण्यात आले. डॉ.जे.एस.पांडे यांनी प्रास्ताविक केले. जया सब्जीवाले यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. याप्रसंगी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी) उत्कृष्ट ‘मॉडेल’ मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान ‘नीरी’तर्फे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान ‘मॉडेल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. ८ वी ते १० वी या गटात भवन्स विद्यामंदिर, आष्टी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि सेंटर पॉर्इंट शाळेच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे पारितोषिक प्रदान करण्यात आले. चंदादेवी सराफ शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. ११वी व १२ वीच्या गटात सांदिपनी स्कूल,सेंटर पॉईन्स स्कूल व भवन्स विद्यामंदिर, आष्टीच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
वैज्ञानिक क्षेत्राला येत आहेत ‘अच्छे दिन’
By admin | Published: April 09, 2017 2:41 AM