लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या वर्षी झालेला मुसळधार पाऊस, यामुळे उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या शरीरावर वाढत असलेले ‘ट्रॉम्बिक्युलीड माईट्स’चे लारव्हे; ज्याला ‘चिगर माईट्स’ म्हणतात, ते शेतात, उंच गवतात, दाट झाडी-झुडपात पसरल्याने आणि तेथून व्यक्तीच्या संपर्कात आल्याने विदर्भच नाही तर मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशावरही ‘स्क्रब टायफस’च्या नव्या आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. केवळ दीड महिन्याचा कालावधीत या गंभीर व संक्रामक आजाराच्या रुग्णांची संख्या १३६वर पोहचली आहे. या आजाराने रविवारी पुन्हा एक महिलेचा बळी घेतल्याने मृत्यूची संख्या १८ झाली आहे.बरमन गोविंद ठाकरे (४०) रा. शिवनी मध्य प्रदेश असे मृत महिलेचे नाव आहे.स्क्रब टायफसवर उपचार न घेतल्यास ५० टक्के रुग्णांना यकृतासह न्यूमोनियाचा त्रास होतो. कावीळ, श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असतो. अनेक अवयव निकामी होतात. साधारण २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. अनेकांच्या रक्तातील प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी कमी होतात. योग्य उपचार मिळाले नाही, तर ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. गेल्या महिन्यात नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात आढळून येणारा हा आजार आता अकोला, बुलढाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यापर्यंत पसरला आहे. नागपूरनंतर मध्य प्रदेशात स्क्रब टायफसच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे.प्राप्त माहितीनुसार, रविवारी मेडिकलमध्ये मृत्यू झालेली ठाकरे नावाची महिला ही गंभीर स्थितीतच आली होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे बळीची संख्या १८ तर रुग्णांची संख्या १३६वर पोहचली आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत, परंतु आजार नियंत्रणात येत नसल्याने लोकांची चिंता वाढली आहे. स्क्रब टायफससाठी कारणीभूत ठरलेला ‘चिगर माईट्स’ या जीवणूच्या तपासणीचे कार्य पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर झुनोसीस प्रयोगशाळे’मध्ये सुरू आहे. सोमवारी पुन्हा तीन उंदीर पकडून या प्रयोगशाळेत आणण्यात आले आहेत.आजाराचे निदान लवकर होत आहेस्क्रब टायफसच्या आजाराचे निदान लवकर होत असल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. परंतु लवकर निदान व उपचार मिळत असल्याने मृत्यूची संख्या कमी झाली आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.डॉ. मिलिंद गणवीरसहायक संचालक, (हिवताप) आरोग्य विभाग नागपूर.चिमुकल्याला स्वाईन फ्लूपुणे, नाशिक भागात स्वाईन फ्लूचे मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येत असताना नागपूर विभागातही आता याला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी पाच वर्षीय चिमुकल्याला स्वाईन फ्लू झाल्याची नोंद घेण्यात आली. नागपूर विभागात आतापर्यंत २२ रुग्ण आढळून आले असून पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. गेल्या आठवड्यापासून मेडिकलच्या बालरोग विभागात उपचार घेत असलेल्या पाच वर्षीय मुलाचा अहवाल शनिवारी ‘पॉझिटिव्ह’ आला. शहरात या रोगाचे एक बळी व पाच रुग्णांची नोंद झाली आहे.