शेतकऱ्यांची फसवणूक : सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष अहवाल सादर होणार नागपूर : सध्या कृषी विभागात गाजत असलेल्या शेडनेट, पॉलिहाऊस व औषधी वनस्पती लागवडीच्या नावाखाली झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणाची अखेर विभागीय चौकशी सुरू झाली आहे. माहिती सूत्रानुसार विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी उमरेड येथील उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी कुही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन अवघ्या आठ महिन्यात भुईसपाट झालेल्या लाखो रुपयांच्या शेडनेट व पॉलिहाऊसची पाहणी केली आहे. दुसरीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी दुपारी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका अधिकाऱ्यांना एक पत्र जारी करू न, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी याच विषयावर बोलाविलेल्या बैठकीला न चुकता हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय या बैठकीत चौकशी समिती आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सादर करणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या सर्व घडामोडींमुळे या प्रकरणातील काही दोषी कृषी अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीला फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसह संबंधित मार्केटिंग कंपन्यांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाला सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. (प्रतिनिधी)
शेडनेट-पॉलिहाऊसची चौकशी सुरू
By admin | Published: August 29, 2015 3:12 AM