लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’ची दहशत निर्माण झाली असून, गेल्या २० दिवसांत १३ रुग्ण व पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली. सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी शासकीयसह काही खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यात शीघ्र प्रतिसाद पथक गठित करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात निदान झालेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला पाठविण्याची सूचनाही दिली. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकलला या रोगावरील प्रभावी औषधही उपलब्ध करून दिले जाणार आहे.‘चिगर माईट्स’ नावाच्या अतिशय सूक्ष्म कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ आजाराचे एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) या महिन्यात १३ रुग्ण आढळून आले. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्याचा विचार केल्यास आतापर्यंत १८ रुग्णांची नोंद झाली आहे. कमी दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याची घटना ‘लोकमत’ने सर्वात आधी २४ आॅगस्टच्या अंकात ‘स्क्रब टायफसच्या ५ रुग्णांचा मृत्यू’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाने घेतली. शासकीय व खासगी रुग्णालयांच्या वरिष्ठांची बैठक बोलविण्यात आली. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. जयस्वाल व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी रोगाचा आढावा घेतला. शीघ्र प्रतिसाद पथक तयार करून या रोगाची नोंद करण्याची सूचना इस्पितळांना देण्यात आल्या.आता प्रत्येक तापाची तपासणीबैठकीत स्क्रब टायफस निदानासाठी व तात्काळ उपचारासाठी शीघ्र ताप सर्वेक्षण करण्याचा सूचना डॉ. जयस्वाल यांनी दिल्या. कीटकशास्त्र सर्वेक्षण, तणनाशक फवारणी व मॅलेथिआॅन पावडरची धुरळणी, ग्रामपंचायतमार्फत स्वच्छता, सर्वेक्षणात आढळून आलेल्या संशयित रुग्णांवर ‘डॉक्सीक्लाईन’ किंवा ‘झिथ्रोमायसी’ औषधोपचार करण्यासही यावेळी त्यांनी सांगितले.स्क्रब टायफससाठी मेडिकलमध्ये स्वतंत्र लॅबएकट्या मेडिकलमध्ये स्क्रब टायफसच्या १३ रुग्णांची नोंद व पाच रुग्णांचा मृत्यू झाले असलेतरी या रोगाची चाचणी व औषधे उपलब्ध नसल्याचे वृत्तही ‘लोकमत’ने २५ आॅगस्टच्या अंकात ‘स्क्रब टायफसचे कसे वाचणार रुग्ण’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. याची दखलही अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. त्यांनी या रोगासोबतच इतरही संसर्गजन्य रोगाच्या निदानासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची सोमवारी स्थापना केली. या प्रयोगशाळेला लागणाºया आवश्यक यंत्रसामूग्रीची तातडीने खरेदीही केली.आरोग्य विभाग देणार औषधीस्क्रब टायफसची लक्षणे दिसताच देण्यात येणारे औषध ‘डॉक्सीक्लाईन’ गोळ्यांच्या व इंजेक्शनच्या स्वरुपात मेडिकल उपलब्ध नसल्याचेही ‘लोकमत’ने सामोर आणले होते. याची दखल घेत आरोग्य विभागाने घेऊन मेयो व मेडिकलला ‘डॉक्सीक्लाईन’ गोळ्यांच्या स्वरुपातील औषध देण्याचा निर्णय घेतला आहे, तर इंजेक्शनची खरेदी मेडिकल स्थानिकस्तरावर करणार आहे.जनजागृती पत्रकही काढले‘सावधान!, स्क्रब टायफस नावाचा आजार फोफवतो आहे’ या मथळ्याचे जनजागृती पत्रकही आरोग्य विभागाने तयार केले आहे. यात लक्षणे व उपाय याची माहिती दिली आहे. ही पत्रके नागपूर शहरसोबतच ग्रामीण भागात दर्शनी भागात लावले जाणार आहे.