नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात गणेशमूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा जास्त असायला नको, असा निर्णय राज्य शासनाने घेऊन काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या निर्णयावर महाराष्ट्रातील मूर्तिकार नाराज झाले आहेत. त्यामुळे नागपुरातील प्रत्येक मूर्तिकाराला लाखोंचे नुकसान होणार असल्याचे मूर्तिकारांचे मत आहे.
घरगुती मूर्ती दोन फुटांपेक्षा उंच नको, असेही निर्णयात म्हटले आहे. गणेश मंडळाच्या मूर्ती चार फूट उंचीच्या राहणार आहेत. मूर्तिकार म्हणाले, नागपुरातील गणेश मंडळातर्फे चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती स्थापन केल्या जातात. त्यासाठी मूर्तिकारांना आकारानुसार पैसेही मिळतात. पण आता मूर्ती चार फूट उंच राहणार असल्याने मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मूर्ती चार फूट असो वा दहा फूट मूर्तिकाराला घडविण्यासाठी तेवढीच मेहनत आणि सामग्री लागते. पण पैसे कमी मिळतील. याशिवाय गेल्यावर्षी अनेक ऑर्डर सोडावे लागले होते. चार फूट उंचीच्या मूर्तीची किंमत १० ते २० हजारांपर्यंत तर आठ ते दहा फूट उंचीच्या मूर्तीची किंमत ६० ते ८० हजारांदरम्यान असते. त्यामुळे चार फूट मूर्ती तयार करण्यासाठी आर्थिक फायदा होत नाही, उलट नुकसानच होते. गेल्यावर्षी अनेक मंडळांनी उत्सव साजरा न करताना लहान मंडप टाकून दोन फूट उंच मूर्ती स्थापन केल्या होत्या. बहुतांश मंडळे आठ ते दहा फूट उंच मूर्तीची स्थापना करतात. पण शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीही अनेक मंडळांनी रुची दाखविली नाही. अद्याप ऑर्डर न मिळाल्याने मूर्तिकारांनी तयारी सुरू केलेली नाही.
पीओपी मूर्तीवर बंदी टाका
पीओपी मूर्ती पर्यावरणास हानिकारक असल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी टाकली होती. पण केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर गेल्यावर्षी पीओपी मूर्तींची सर्वाधिक विक्री झाली. त्याचा परिणाम जिल्ह्यातील मूर्तिकारांवर झाला. मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीच्या मूर्तीची कलाकुसर चांगली असल्याने त्याची जास्त विक्री झाली. प्रशासनाने यंदा पीओपी मूर्तींच्या विक्रीवर बंदी टाकावी, अशी मूर्तिकारांची मागणी आहे.
नागपूरबाहेर जातात मूर्ती
नागपुरातील गणेशमूर्तीला सर्वाधिक पसंती असते. या मूर्तींची नागपूरबाहेर मोठ्या प्रमाणात विक्री होते. कोरोना महामारीने सर्वजण त्रस्त आहेत. अशा स्थितीत नियम करून मूर्तिकारांना त्रास देऊ नये. मूर्तिकारांचा सर्वाधिक व्यवसाय गणेश मंंडळांकडून होतो. प्रत्येक मूर्तिकार वर्षभराचा खर्च गणेश उत्सवातून काढतो. पण यंदाही उंची कमी झाल्याने नुकसान होणार आहे.
मूर्तिकार आर्थिक संकटात
शासनाच्या निर्णयामुळे यंदाही मूर्तिकार संकटात आले आहेत. सर्वच मूर्तिकारांचा वार्षिक खर्च या उत्सवाच्या माध्यमातून निघतो. पण उंची कमी झाल्याने मूर्तीची किंमतही कमी झाली आहे. मेहनत आणि सजावटीची सामग्री तेवढीच लागते, पण किंमत कमी मिळते. या निर्णयामुळे सर्वच मूर्तिकार नाराज आहेत.
विनोद सूर्यवंशी, मूर्तिकार.