लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - डोळ्यात मिरची पावडर झोकून तीन भामट्यांनी दोघांना मारहाण केली आणि त्यांच्याजवळचे सव्वातीन लाखांचे दागिने हिसकावून नेले. जबलपूर - हैदराबाद महामार्गावर शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. संजय जगदीशप्रसाद तिवारी (वय ५०) असे फिर्यादीचे नाव आहे. ते मूर्तिकार असल्याचे समजते. त्यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री त्यांना त्यांचा मित्र अक्षय रवी नवसारेने फोन करून दोनशे रुपये उधार मागितले. त्यामुळे तिवारी दोनशे रुपये देण्यासाठी म्हाळगीनगर चौकात पोहचले. येथे अक्षयने त्यांना सोबत चला, असे म्हणत त्यांची दुचाकी स्वत: हातात घेतली आणि तिवारींना मागे बसविले. जबलपूर हैदराबाद मार्गावरील हिवरकर लेआऊटसमोर ते लघुशंका करीत असताना तीन भामटे त्यांच्याकडे आले. एकाने अक्षयला दगड फेकून मारला तर दोघांनी तिवारी यांच्या डोळ्यात मिरची पावडर झोकली. त्यांना रस्त्यावरून शेतात ओढत नेत हातावर चाकू मारला. नंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याची रुद्राक्षाची गाठलेली माळ, ब्रेसलेट, सोने तसेच हिऱ्याची अंगठी आणि अक्षयचा मोबाइल असा ३ लाख, २६, ५०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून आरोपी पळून गेले. तिवारी यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----