लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी गांधीबाग झोनमधील मोमीनपुरा परिसरातील कमल कलेक्श्न, इम्ताज किराणा, फैजल फूटवेअर, नवाब बेकरी, साजीद डेअरी, हैद्राबादी चिकन व लिड्रेस स्टोअर्स यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने ही सहा दुकाने सील केली.
महापालिकेने २९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ८८ हजाराचा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, धरमपेठ विभागांतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार रुपये दंड केला. हनुमाननगर पथकाने दोन दुकानाची तपासणी केली. धंतोलीच्या पथकाने ९ दुकानांची तपासणी करून ५ हजाराचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, गांधीबाग येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ४० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार रुपये, लकडगंज पथकाने सहा दुकानांची तपासणी करून १८ हजार रुपये, आसीनगर पथकाने १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, तर मंगळवारी झोन पथकाने चार दुकानांची तपासणी करून २५ हजार रुपये दंड वसूल केला. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.