लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटक स्वत:ला डॉक्टर संबोधून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार सुरू आहेत. या वर्षात दोन घटना समोर आल्या आहेत. परंतु बोगस डॉक्टरांची मोहीम थंडावल्याने शहरात व ग्रामीण भागात बिनधास्तपणे यांचा व्यवसाय सुरू असून रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे.
नागपूरच्या कामठी परिसरामध्ये बारावी पास असलेल्या एका फळ विक्रेत्या बोगस डॉक्टरला ८ मे २०२१ रोजी पोलिसांनी अटक केली. चंदन चौधरी असे त्या बोगस डॉक्टराचे नाव. चंदन हा मूळचा बिहारचा असून गेल्या काही महिन्यापासून तो नागपूरमध्येच आहे. त्याने बोगस डिग्री बनवनू धर्मार्थ नावाने रुग्णालय थाटले. यूट्यूब आणि इंटरनेट पाहून रुग्णांना इंजेक्शन देणे, सलाईन देणे व औषधोपचार करीत होता. एवढेच नव्हे तर त्याने कोरोना रुग्णांवरही उपचार केल्याचे समजते. मात्र हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी चंदनला बेड्या ठोकल्या.
बोगस डॉक्टरांचा धंदा केवळ शहरातील झोपडपट्टीत किंवा ग्रामीण भागातच नाही तर मेडिकलसारख्या रुग्णालयातही चालत असल्याचा ११ जून २०२१ रोजीच्या घटनेतून समोर आले. सिद्धार्थ जैन नावाच्या युवक स्वत:ला डॉक्टर संबोधून गरीब रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करीत होता. त्याला अटक करण्यात आलेल्या दिवशी मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये चक्क तो कोरोना संशयित रुग्णाचे नमुने घेत होता. एका ‘सीएमओ’ला त्याचा संशय आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पकडून अजनी पोलिसांकडे सुपूर्द केले. या दोन घटनावरून बोगस डॉक्टरांचा व्यवसाय जोरात सुरू असल्याचे दिसून येते. परंतु बोगस डॉक्टरांची शोधमोहिम व कारवाई थंडबस्त्यात असल्याचे नागपूर जिल्ह्यातील चित्र आहे.
तक्रार आल्यावरच कारवाई
महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, महानगरपालिकेकडे बोगस डॉक्टरची तक्रार आल्यावर संबंधिताची डिग्री तपासली जाते. त्याची डिग्री बोगस आढळल्यावर त्याला पोलिसांच्या हवाली केले जाते. परंतु बोगस डॉक्टरांचा शोध घेतला जात नाही.
पकडलेल्या बोगस डॉक्टरांची आकडेवारी
बोगस डॉक्टरांच्या संदर्भात तूर्तास तरी तक्रारी नाहीत. परंतु आल्यावर तातडीने कारवाई केली जाते. मागील दीड वर्षात पकडलेल्या बोगस डॉक्टरांची आकडेवारी उपलब्ध नाही.
-डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक