नीरीच्या वैज्ञानिकांवर संशोधनाची जबाबदारीनिशांत वानखेडे नागपूरगंगानदीबाबत भारतीय जनमानसात पवित्र असे स्थान आहे. गंगेचे पाणी अमृततुल्य मानून त्यात ब्रह्मतत्त्व असल्याची मान्यता प्राचीन काळापासून लोकांमध्ये आहे. लोकांच्या या मान्यतेला वैज्ञानिक जोड देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या नद्या व गंगा पुनर्वसन मंत्रालयातर्फे केला जात आहे. गंगेच्या पाण्यात असणारे मानवी आणि सजीवसृष्टीच्या फायद्याचे औषधीतत्त्व पूर्वी असलेल्या प्रमाणात आहेत की प्रदूषणामुळे त्यांचा ऱ्हास झाला, याच्या संशोधनाचे काम नॅशनल एनव्हायर्नमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट(नीरी)मध्ये सध्या सुरू आहे.सरकारच्या ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’अंतर्गत गंगानदीमध्ये झालेले प्रदूषण व गंगासफाईची एकू णच जबाबदारी नागपूरच्या नीरी संस्थेवर सोपविण्यात आली आहे. या संशोधनाच्या कामात नीरीच्या १३ वैज्ञानिकांची टीम कार्यरत असून नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांच्या मार्गदर्शनात व डॉ. पवन लाभशेटवार यांच्या नेतृत्वात ही टीम कार्यरत आहे. या अभियानांतर्गत औषधीतत्त्वांचे संशोधन हाही महत्त्वाचा भाग आहे. गंगेच्या पाण्यात औषधीतत्त्व होते की नाही, कोणकोणत्या औषधीतत्त्वांचा पाण्यात समावेश आहे, आता याचे प्रमाण किती आहे व प्रमाण कमी झाले असेल तर प्रदूषणाचा या तत्त्वांवर कसा परिणाम झाला, या महत्त्वपूर्ण बाबींचे संशोधन केले जाणार आहे. गंगासफाईचा हाच मुख्य बिंदू असून याच संशोधनाच्या आधारावर गंगासफाईचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे संशोधन आणि विकास नियोजन विभागाचे प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रकाश कुंभारे यांनी स्पष्ट केले. गंगा सफाईचा केंद्रबिंदूप्रदूषणामुळे या औषधीयुक्त ब्रह्मतत्त्वांची हानी झाले असेल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. विशेषत: शहरी वस्ती, नाल्यांमुळे येणारे प्रदूषण व कारखाने असलेल्या भागात ही शक्यता अधिक आहे. गंगेच्या पात्रातील ज्या भागात या तत्त्वांचे प्रमाण कमी आढळून येईल त्या भागाच्या सफाईवर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गंगेच्या पाण्यात ब्रह्मतत्त्वांचा शोध
By admin | Published: August 27, 2015 2:46 AM