कोंढाळी : गत सहा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या कचारी सावंगा येथील एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात कोंढाळी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कोंढाळी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला कोंढाळी नजीकच्या कलमुंडा येथून ताब्यात घेत तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले.
कचारी सावंगा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात ११ व्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी १९ डिसेंबर २०२० ला सकाळी ११ वाजता कॉलेजमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ होऊन ती घरी परत आली नसल्याने वडिलांनी तिच्या कॉलेजमध्ये चौकशी केली असता तिथे कुणीही नव्हते. यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरु केला पण ती मिळाली नाही. शेवटी २२ डिसेंबर रोजी तिच्या वडिलांनी याबाबत कोंढाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत कोंढाळी नजीक असलेल्या कलमुंडा येथील प्रवीण सेवकराम बारई याने मुलीला पळविल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरण अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे असल्याने ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राम ढगे, पोलीस नायक संतोष राठोड हे गत सहा महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करीत होते. यासाठी पोलिसांनी खबऱ्याची मदत घेतली. ही मुलगी २७ जून रोजी कलमुंडा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी कलमुंडा गाठून मुलीला ताब्यात घेतले. यानंतर तिला वैद्यकीय चाचणीसाठी नागपूर येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.