नागपूर विद्यापीठ : ४ एप्रिलला मुलाखतीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नवनियुक्त कुलगुरू कोण असणार याबाबत उत्सुकता ताणल्या गेली आहे. पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध लवकरच संपणार आहे. शोध समितीने १८ उमेदवारांना सादरीकरणासाठी ४ एप्रिल रोजी वर्धा येथील मगनवाडी येथील ‘एमगिरी’ (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इन्डस्ट्रीअलाझेशन) येथे बोलविले आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ताजपासून सुरू झालेला कुलगुरूंचा शोध मगनवाडीमार्गे राजभवन असा होणार आहे. दरम्यान, कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी कुठल्याही राजकीय प्रभावाशिवाय निष्पक्षपणे पाच उमेदवार निवडण्यात यावे अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.डॉ. विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले कुलगुरुपद भरण्यासाठी शोध समितीने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. सुमारे १३७ जणांचे अर्ज आले. शोध समितीने मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेऊन पात्र उमेदवारांची छाननी केली. दरम्यान, समितीच्या पंचतारांकित बैठकांची बाब समोर आल्याने इतकी उधळपट्टी का असा प्रश्न समोर आला. त्यामुळे उगाच वाद नको म्हणून शोध समितीने पुढील मुलाखतींसाठी थेट गांधीभूमी गाठण्याचा निर्णय घेतला.४ एप्रिल रोजी १८ उमेदवारांच्या मुलाखती ‘एमगिरी’ येथे घेण्यात येणार आहेत. संबंधित उमेदवार आता निवड समितीसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण करणार आहेत. यातून शोध समितीतर्फे पाच उमेदवारांची नावे राज्यपाल कार्यालयाला सुचविण्यात येतील. राज्यपाल या पाच उमेदवारांच्या मुंबईतील राजभवन येथे मुलाखती घेतील व कुलगुरूंच्या नावाची घोषणा करतील.(प्रतिनिधी)शर्यतीतील नावांबाबत उत्सुकतानागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होण्यास अनेक जण इच्छुक होते. शिवाय, आपणच या पदासाठी अर्हताप्राप्त आहोत, असे पुन:पुन्हा सांगत होते. शोध समितीकडून पात्र उमेदवारांना ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. नागपूर विद्यापीठातील सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ काणे यांचा नागपुरातून समावेश आहे. दरम्यान इतर उमेदवार कोण आहेत याबाबत शोध समितीकडून मौन बाळगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील प्रत्येकी दोन तसेच विदेशातील दोन उमेदवारांचादेखील समावेश आहे. उत्तर भारतातूनदेखील उमेदवार असल्याची माहिती आहे.वशिलेबाजीला थारा नकोकुलगुरूपदासारख्या महत्त्वाच्या पदाची निवड करत असताना शोध समितीने केवळ ‘मेरिट’च लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना विद्यापीठाचा विकास अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नेतृत्व निवडताना शोध समितीकडून वशीलेबाजी अन् पक्ष राजकारणाला अजिबात विचारात घेतले जाणार नाही व दोन्ही नेत्यांप्रमाणेच पारदर्शक कारभार राहील अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
कुलगुरूंचा शोध.. ताज ते मगनवाडी!
By admin | Published: March 31, 2015 2:14 AM