नागपूर : मागील काही काळापासून सायबर गुन्हे वाढले असून ग्राहकांनी कुठलेही व्यवहार करताना सावध राहावे व अधिकृत क्रमांकांवरच संपर्क साधावा, असे आवाहन बॅंकांकडून करण्यात येते. मात्र एका बॅंकेचा व्यवस्थापकच या मूलभूत काळजीच्या गोष्टी विसरला. गुगलवरून दुसऱ्या बॅंकेचा ग्राहक संपर्क क्रमांक शोधणे संबंधित व्यवस्थापकाला भोवले व सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढत १.९९ लाखांचा गंडा घातला. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हा प्रकार ऐकून पोलिसदेखील अवाक् झाले होते.
धनराज किशन पाठराबे (५९) असे हे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोराडी शाखेचे व्यवस्थापक आहेत. १९ जुलै रोजी त्यांनी चुकीने त्यांच्या बॅंक खात्यातून भलत्याच खात्यात पैसे ट्रान्सफर केले. त्यामुळे त्यांनी एचडीएफसी बॅंकेत चौकशी करण्यासाठी संपर्क क्रमांक शोधला. त्यांना गुगलवर जो क्रमांक मिळाला त्यावर त्यांनी संपर्क केला असता समोरील व्यक्तीने मी बॅंकेतच असून तुमची तक्रार नोंदवून घेतो, असे सांगितले. समोरील व्यक्तीने त्यांना एनी डेस्क ॲप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना रिक्वेस्ट पाठविली.
त्याच्या सांगण्यावरून पाठराबे यांनी नेट बॅंकिंग ओपन करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड टाकला. तेव्हा त्यांच्या मोबाइलवर दोन ओटीपी आले. ते त्यांनी त्याला शेअर केले नाही. मात्र तरीदेखील त्यांच्या बॅंक खात्यातून रुपये ९९,९९९ व रुपये ९९,९९८ असे दोनदा डेबिट झाले. तेव्हा त्यांना आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अगोदर सायबर पोलिस ठाणे व नंतर कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.