नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या हंगामात होऊ घातलेली प्रवासी भाडेवाढ एसटी महामंडळाने रद्द केली. विशेष म्हणजे, ११ ऑक्टोबरला हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने जाहीर केला होता आणि त्याला ७२ तास होत नाही तोच आज आपलाच निर्णय फिरवीत हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.
दिवाळी आणि भाऊबीजेसाठी प्रत्येक लाडकी बहीण आपल्या माहेरी जाते. तिच्या पाठोपाठ तिचा पतीही सासरी जातो. अर्थात दिवाळीला प्रवाशाची प्रचंड गर्दी वाढत असल्याचा अनुभव लक्षात घेता एसटी महामंडळाकडून दरवर्षी हंगामी भाडेवाढ करण्यात येते. यावर्षी सुद्धा २५ ऑक्टोबर पासून तो २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एसटीच्या प्रवास भाड्यात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. तशा प्रकारचे पत्र एसटीचे प्रत्येक अधिकाऱ्याला पाठविण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक आगारातील अधिकाऱ्याने हंगामी प्रवास भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी चालवली होती. मात्र, ११ तारखेच्या या निर्णय पत्राला बहात्तर तास होत नाही तोच महामंडळाच्या शीर्षस्थानकडून हा निर्णय फिरविण्यात आला. एसटीच्या आगारप्रमुखांना आज १४ ऑक्टोबरला एक नवीन पत्र पाठविण्यात आले. या पत्रानुसार ११ तारखेच्या निर्णयाला अर्थात दिवाळीच्या हंगामी प्रवास भाडेवाढ करण्याच्या निर्णयाला रद्द करण्यात आल्याचे या पत्रात नमूद आहे.
विशेष म्हणजे, विधानसभेच्या निवडणुकीचे वेध उभ्या महाराष्ट्राला लागले आहे. तशी तयारी राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे. पुढच्या काही तासात आचारसंहिता लागवण्याचीही वाचता केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हंगामी प्रवास भाडे वाढविण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.