सहा वर्षांपूर्वी मुलाने गमावला जीव : अपघाताने व्यापारी-उद्योजकांमध्ये तीव्र शोककळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिमूरजवळ झालेल्या अपघातात नागपूरच्या उद्योग जगतात मोठे नाव असलेले अशोक गोयल अग्रवाल यांच्या मुलाचा आणि नातीचा मृत्यू झाला तर, नेहा आशिष गोयल, मिनू अमिनेश गोयल, निशा अभिषेक गोयल आणि इशिका आशिष गोयल हे चौघे जखमी झाले आहेत. या अपघातामुळे गोयल कुटुंबीयांवर सहा वर्षात दुसऱ्यांदा आघात झाला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नागपूर विदर्भातील प्रतिष्ठित उद्योजक म्हणून अशोक गोयल यांचे नाव आहे. वर्धमान नगरात त्यांची सोनु मोनु इंडस्ट्रीज आहे. त्यांना अभिषेक, आशिष ऊर्फ सोनू आणि अमिनेश ऊर्फ मोनू ही तीन मुले होती. यापूर्वी अभिषेक यांची कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या आघातातून गोयल कुटुंबीय कसेबसे सावरले असताना मंगळवारी १ डिसेंबरला त्यांच्यावर दुसरा आघात झाला. ताडोबाच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी निघालेला त्यांचा मुलगा अमिनेशन ऊर्फ मोनू तसेच त्यांची नात श्रेया या दोघांचा मृत्यू झाला. व्यावसायिक व्यस्ततेमुळे दिवाळीत बाहेर जायला भेटले नाही. त्यामुळे गोयल परिवाराने ताडोबा सफरीची योजना बनवली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास दोन कारमध्ये परिवारातील सदस्य वाहनचालकासह बसले आणि ताडोबाकडे रवाना झाले. अपघातग्रस्त कार निशा चालवत होती. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे चिमूरजवळ कार नाल्यात पडली. त्यामुळे झालेल्या अपघातात अशोक गोयल यांची नात श्रेया हिचा जागीच मृत्यू झाला. तर नागपूरला उपचारासाठी आणताना अमिनेश ऊर्फ मोनू यांनीही प्राण सोडला. या अपघाताचे वृत्त कळताच नागपूर शहरातील व्यापार-उद्योग जगतात तीव्र शोककळा पसरली. मोनू आणि श्रेयाचा मृतदेह मेयोत पाठविण्यात आले. तर जखमींना धंतोली येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
उद्योजक असलेले अशोक गोयल राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशीही जुळलेले आहे. ते नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचेही अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अपघाताचे वृत्त कळताच अनेक मान्यवर त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून गोयल कुटुंबीयांचे सांत्वन केले. तर आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, राधेश्याम सारडा, अतुल कोटेचा यांच्यासह अनेकांनी घरी पोहोचून त्यांचे सांत्वन केले.
गोयल यांच्या मुलाचा आणि नातीचा अंत्यसंस्कार बुधवारी २ डिसेंबरला केला जाणार आहे. अंत्ययात्रा अशोक गोयल यांच्या देशपांडे ले-आउट मधून वाठोडा घाटावर दुपारी २ वाजता जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे.
---