सुनील वेळेकर
धापेवाडा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथील आषाढी यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आषाढ प्रतिपदेला धापेवाडा मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट होता. शनिवारी पहाटे ५.४५ वाजता श्री कोलबास्वामी देवस्थानचे मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांच्याहस्ते विठूरायाची महापूजा व अभिषेक संपन्न झाला. यावेळी गुरुमाता सरस्वती वेळेकर, तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाबा कोढे, श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानचे सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, सरपंच सुरेश डोंगरे, विनोद मेश्राम उपस्थित होते.
विदर्भाची पंढरी शांत
आषाढी पौर्णिमेला पंढरपूरचा पांडुरंग धापेवाड्यात अवतरतो अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे शुक्रवारी रात्री १२ वाजता धापेवाड्यात पांडुरंगाचे आगमन झाले. त्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी उसळणारी गर्दी, दिंडी पालख्या, भजने, टाळ, मृदंग, पताका यंदा नसल्याने संपूर्ण मंदिर परिसरात व गावात शांतता होती. कडेकाट पोलीस बंदोबस्त असल्याने कोणतीही दिंडी, भजने मंदिरात दाखल झाले नाही. सुमारे २८० वर्षांपासूनचा इतिहास असलेल्या येथील आषाढी यात्रेला दुसऱ्यांदा खंड पडला.
ग्रामस्थांचे सामंजस्य
दरवर्षी घरोघरी यात्रेनिमित्य नातेवाईकांची गर्दी असते. मात्र कोरोनामुळे यंदा सर्वांकडे शांतता होती. कोणतेही नातेवाईक वा बाहेरील व्यक्ती गावात दाखल झाले नाही. किमान ग्रामस्थांना मंदिरात प्रवेश द्यायला पाहिजे होता असे गावकरी आपापसात बोलत होते. मात्र शासनाच्या व मंदिर प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत ग्रामस्थांनी समजुतदारपणाचा परिचय दिला.