नागपूर : हिवाळी अधिवेशन महिन्याभरावर आले असताना नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेवर परत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. २४ तासांत नागपुरात दोन हत्या झाल्या. रविवारी रात्री पाचपावली येथे पूर्ववैमनस्यातून गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडाची हत्या केली. ही घटना लष्करीबागेतील बौद्ध चौकात घडली. या घटनेमुळे पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात खळबळ उडाली होती.
रोहन शंकर बिऱ्हाडे (२१, कुराडकरपेठ, लष्करीबाग) असे मृताचे नाव आहे. तर वीरेंद्र उर्फ बाबू बकरी बब्बलसिंग रामगडिया (२५), अच्छी इंदूरकर (२२) आणि येशुदास उर्फ सँकी परमार (२२) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी लष्करीबागेतील रहिवासी आहेत. रोहन हा परिसरातील कुख्यात गुन्हेगार सौरभ वासनिकचा मित्र आहे. बाबू बकरी हा या हत्येचा सूत्रधार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दंगलीसह १८ गुन्हे दाखल आहेत. त्याचे सराईत गुन्हेगार सौरभ वासनिक याच्याशी अनेक दिवसांपासून शत्रुत्व आहे.
या दोघांमध्ये अनेकदा वर्चस्वाच्या लढाईतून वाददेखील झाले आहेत. महिनाभरापूर्वी सौरभ आणि रोहनने बाबूला मारहाण केली होती. तेव्हापासून वैर खूप वाढले होते. सौरभला काही दिवसांपूर्वी एमपीडीएतून सोडण्यात आले होते. सुटकेनंतर बाबूसह तिघांवर हल्ला झाल्याने पोलिसांनी लगेच कारवाई केली व आठवडाभरापूर्वी त्यांनी सौरभला एमपीडीएअंतर्गत तुरुंगात पाठवले.
सौरभ तुरुंगात गेल्याने बाबू आणि त्याच्या साथीदारांनी रोहनचा खात्मा करण्याची योजना आखली. 'डोळे वटारून का पाहतो' असे म्हणत बाबूने रोहनशी अनेकदा वाद घातला होता. रोहन आणि बाबू यांच्यावर अलीकडचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे बाबू रोहनचा बदला घेईल, असा संशय पोलिसांना आला नाही.
रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास बाबू आणि त्याच्या साथीदारांनी रोहनला बौद्ध चौकाजवळ घेरले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर त्याला विटा आणि फरशीने मारहाण करण्यात आली. यात रोहन गंभीर जखमी झाला. रोहनच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे मित्र मदतीसाठी धावले. त्यांना पाहताच आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहनला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सोमवारी सायंकाळी आरोपींना अटक केली.
‘एमपीडीए’मुळे वाचला सौरभचा जीव
बाबू बकरी आणि त्याच्या साथीदारांना सौरभ वासनिकची हत्या करायची होती. याबाबत पोलिसांना सुगावा लागला होता. हे टाळण्यासाठी पोलिसांनी अल्पावधीतच एमपीडीएची दुसरी कारवाई करत सौरभला तुरुंगात पाठवले. पोलिसांच्या कारवाईमुळे सौरभचा जीव वाचला.