नागपूर : सध्या देशात कोरोनाचा ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय. यातच आज गुरुवारी नागपूर शहरात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या या रुग्णावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू आहेत. त्याला कुठलीही लक्षणे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे.
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. नववर्षाच्या उत्साहासोबत दिवसेंदिवस ओमायक्रॉनचे संकटही वाढत चालले आहे. नागपुरातील २१ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाली असून, हा तरुण दुबईहून नागपुरात दाखल झाल्याची माहिती आहे. सध्या या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. तो धंतोली येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, तो १८ डिसेंबर रोजी दुबईहून विमानसेवेने नागपुरात आला. येथे त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. १९ डिसेंबर रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने त्याला ‘एम्स’मध्ये दाखल केले. या दरम्यान त्याचे नमुने जनुकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असता, त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. १० दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना तपासणी केली जाईल, अशी माहिती ‘एम्स’च्या डॉक्टरांनी दिली.
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण होम क्वारंटाईन
पश्चिम आफ्रिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला ४० वर्षीय पुरुष ५ डिसेंबर रोजी नागपूर विमानातळावर आला असताना त्याची ६ डिसेंबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. १२ डिसेंबर रोजी त्याला ‘ओमायक्रॉन व्हेरिएंट’ची बाधा झाल्याचे निदान झाले. २१ डिसेंबर रोजी त्याची २४ तासांच्या अंतराने आरटीपीसीआर चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. यामुळे २२ डिसेंबर रोजी त्याला ‘एम्स’मधून सुटी देण्यात आली. पुढील १० दिवस त्याला सक्तीचे होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी आधीच दिला दम
ख्रिसमस व ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आयोजन होणार नाही तसेच सक्तीने कोविड प्रोटोकॉलचे पालन होईल, यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच पोलीस विभागातर्फे संबंधित प्रतिनिधींना सूचना देण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.