कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला. दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी चार जिल्ह्यांतील ३० जागांवर मतदान होईल.
या टप्प्यात ७५ हजार ९४ हजार ५४९ मतदार राहणार असून १७१ उमेदवार रिंगणात आहेत. १० हजार ६२० मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतदानादरम्यान कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये यासाठी ‘सीएपीएफ’च्या ६५१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बांकुरा, पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर व दक्षिण चोवीस परगणा येथे मतदान होणार आहे.
अखेरच्या दिवशी रणधुमाळी
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथे रोड शो काढला. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ गृहमंत्री अमित शहा यांनी सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासमवेत रोड शो केला. ममता यांनी अधिकारी यांच्यावर गद्दार व ‘मीर जाफर’ असल्याचा आरोप लावला.