सुमेध वाघमारे
नागपूर : ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारच्या दाव्यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली संख्या, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पडलेला तुटवडा त्यामुळे इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्याची आलेली वेळ हे वेगळेच काही सांगत आहे. यातच कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जवळपास ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागले. तब्बल ४० टक्क्याने ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोजी आढळून आला. पहिल्या लाटेची तीव्रता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर, दुसऱ्या लाटेची तीव्रता मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होती. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) बधिकरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली शेलगावकर यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही लाटेचा तीव्रतेचा दरम्यान रुग्णांकडून झालेल्या ऑक्सिजन मागणीचा अभ्यास करण्यात आला. त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे.
-दर मिनिटाला १० ते ७० लिटर ऑक्सिजनची
अभ्यासाची माहिती देताना डॉ. शेलगावकर म्हणाल्या, कोरोनाचा पहिल्या लाटेतील रुग्णसंख्येच्या उच्चांकाच्या कालावधीत मेयोत कोरोनाचे ५९८ बेड फुल्ल होते. यातील जवळपास ५५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. एका रुग्णाला दर मिनीटाला कमीत कमी ५ तर जास्तीत जास्त ४० लिटर ऑक्सिजन लागत होते. दुसऱ्या लाटेचा उच्चांक दरम्यान ६०० वर बेड फुल्ल होते व यातील ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. यावेळी एका रुग्णाला दर मिनिटाला कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ७० लिटरपर्यंत ऑक्सिजन लागत होते.
-पहिल्या लाटेत १६ तर दुसºया लाटेत २३ मेट्रिक टन ऑक्सिजन
अभ्यासात असे आढळून आले की, पहिल्या लाटेत ज्यावेळी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते त्यावेळी दर दिवसाला लिक्विड ऑक्सिजनची मागणी १६ ते १७ मेट्रिक टन होती. दुसऱ्या लाटेत ही मागणी दर दिवसाला २३ ते २४ मेट्रिक टनपर्यंत पोहचली.
-तिसऱ्या लाटेत ५००वर मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी
संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास ऑक्सिजन मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत एका दिवशी १९४ मेट्रिक टनपर्यंत मागणी गेली होती. यामुळे दुसऱ्या लाटेत साधारण ५०० ते ६०० मेट्रिक टनपर्यंत मागणी जाण्याची शक्यता आहे.
-डॉ. वैशाली शेलगावकर
प्रमुख, बधिरीकरण विभाग, मेयो