नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजवला होता. रुग्ण व मृत्यूच्या संख्येने धडकी भरवली होती. परंतु आता कोरोनाचा या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत घट आली. रविवारी ३१०४ नव्या रुग्णांची व ७३ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,४९,०७५ तर मृत्यूची संख्या ८,१४२ झाली. विशेष म्हणजे, दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, ६,५४४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला. यातच अपुऱ्या वैद्यकीय सोयींमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु आता कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे काहीशी परिस्थिती बदलत आहे. ऑक्सिजन खाटांसाठी भटकंती थांबल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या उपलब्ध साठ्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. उल्लेखनीय म्हणजे, यावर्षी १७ मार्चला पहिल्यांदा ३३७० रुग्णांची नोंद झाली होती. ७ एप्रिलपासून ५ हजारांवर रुग्णांची नोंद होऊ लागली. त्यानंतर मे महिन्याच्या २ तारखेला ५००७ रुग्ण आढळून आले. ३ मे पासून रुग्णसंख्या ओसरू लागली. परंतु मृत्यूचा दर अद्यापही कायम आहे.
-शहरात १६१४ तर, ग्रामीणमध्ये १४७९ आढळले रुग्ण
शहर व ग्रामीण मिळून रविवारी कमी चाचण्या झाल्या. १४,७०२ आरटीपीसीआर व ३१३३ रॅपिड अँटिजन मिळून १७,८३५ चाचण्या झाल्या. यातून शहरातील १६१४ तर ग्रामीणमधील १४७९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील ४७ रुग्णांचे तर ग्रामीणमधील १५ रुग्णांचे बळी गेले. आतापर्यंत शहरात ३,१७,९०९ रुग्ण व ४,९२१ मृत्यूची नोंद झाली. ग्रामीणमध्ये १,२९,८१९ रुग्ण पॉझिटिव्ह आले व २०५६ रुग्णांचे जीव गेले.
कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १७,८३५
एकूण बाधित रुग्ण :४,४९,०७५
सक्रिय रुग्ण : ५४,७३२
बरे झालेले रुग्ण :३,८६,२०१
एकूण मृत्यू : ८,१४२