नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेत बैठी जीवनशैली, मसालेदार पदार्थाचे अधिक सेवन व काढ्याच्या अतिरेकी वापरामुळे पाइल्स व फिशरच्या रुग्णांत १५ टक्क्याने वाढ झाली होती; परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे ३८ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गुदरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश जुननकर यांनी सांगितले, २०२० मध्ये पाइल्स व फिशरच्या १२३ रुग्णांवर उपचार केला असताना, या वर्षात एप्रिलपर्यंत १७० रुग्ण उपचारासाठी आले आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य रुग्ण कोरोनाबाधित किंवा कोरोना होऊन गेलेले आहेत.
आहारातील तंतुमय पदार्थाची कमतरता, पाणी पिण्याचे कमी झालेले प्रमाण, बैठी जीवनशैली, औषधांचा प्रभाव, लठ्ठपणा व अनुवांशिकता आदींमुळे पाइल्स म्हणजेच मूळव्याधची समस्या वेगाने वाढत आहे. शौचाच्या वेळी वेदना होणे, रक्तस्राव होणे, गुदद्वाराचा भाग फुगीर होणे, गाठी निर्माण होणे, खाज सुटणे ही मूळव्याधची सर्वसामान्य लक्षणे आहेत. पहिल्या लाटेत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी घरगुती काढ्यासोबतच विविध कंपन्यांच्या काढ्याचे मोठ्या प्रमाणात सेवन झाले. याशिवाय, लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक घरीच असल्याने बैठी जीवनशैली वाढली. यातच बाहेरून मागविण्यात आलेले तिखट व मसालेदार पदार्थाच्या अतिसेवनाने मूळव्याधीचे आजार वाढले. सुरुवातीच्या लक्षणांकडे काहींनी दुर्लक्ष केले; परंतु सहन करण्यापलिकडे आजार वाढल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे येऊ लागले. मागील वर्षी रुग्णालयात एकट्या पाइल्सचे ६९ तर फिशरचे ५४ असे एकूण १२३ रुग्ण आढळून आले. तर जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्याच्या कालावधित पाइल्सचे ९० तर फिशरचे ८० असे एकूण १७० रुग्ण दिसून आले.
-रेमडेसिविर, फॅविपीरॅवीर, स्टेरॉईडचा प्रभाव
डॉ. जुननकर म्हणाले की, कोरोनावरील उपचारात रेमडेसिविर, फॅविपीरॅवीर, स्टेरॉईडससारख्या औषधांचा मोठा वापर होत आहे. काही रुग्णांमध्ये याचा परिणाम शरीराच्या नाजूक जागेवर विशेषत: गुदभागात होत असल्याचे दिसून आला आहे. विशेषत: कोरोना झालेल्यांमध्ये व या आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांमध्ये पाइल्स, फिशर आजार वाढले आहेत. काही रुग्ण याकडे दुर्लक्ष करून डॉक्टरांकडे जाणे टाळत असल्याने अशा रुग्णांमध्ये पुढे ‘भगंदर’ म्हणजे ‘पिस्टुला’ झाल्याचेही दिसून येत आहे.
-लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
ज्येष्ठांचा आजार म्हणून मूळव्याधची ओळख होती; परंतु आता १८ ते ४० वयोगटात हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. या आजाराला दूर ठेवण्यासाठी तंतूमय पदार्थ, पिण्याचे पाण्याचे प्रमाण, सावजी व मसालेदार पदार्थांचे कमी सेवन व योग्य जीवनपद्धती आत्मसात करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणतीही लक्षणे दिसताच ते अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार गंभीर होणे टाळता येते.
-डॉ. नीलेश जुननकर, गुदरोग तज्ज्ञ (फोटो)